मुंबई : मुंबईत आठवड्याभरापूर्वी सुरू झालेल्या अठरा वर्षांहून अधिकच्या बूस्टर डोस मोहिमेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. शहर उपनगरात आतापर्यंत १८ वर्षांहून अधिकच्या ११ हजार २४७ लाभार्थींनी डोस घेतला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालय व्यवस्थापनाने प्रतिसाद वाढल्यानंतर लस मात्रांचा साठा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अठरा वर्षांवरील कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस मोहिमेला १० एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. त्यानंतर या लसीकरणाविषयी लाभार्थींमध्ये फारशी उत्सुकता नसल्याचे वैद्यकीय वर्तुळातील निरीक्षण आहे. याविषयी खासगी रुग्णालयांचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले, सध्या या मोहिमेला फारसा प्रतिसाद नाही. कारण संसर्ग संपूर्णपणे नियंत्रणात असल्याने लाभार्थींमधील कोरोना विषाणूबद्दलची भीती निघून गेली आहे. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, काही शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता पुढील आठवड्यात हा प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रतिसाद पाहून नंतरच लससाठा खरेदीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. सध्या शहरातील केवळ ८ ते १० खासगी रुग्णालयांचा या लसीकरण मोहिमेत सहभाग आहे. यापूर्वी, मुदत संपलेल्या लससाठ्याचे काय करायचे, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे लस मात्रा वाया जाऊ नये या दृष्टीने नवीन साठा खरेदीचे नियोजन करण्यात येणार आहे.
हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. जय मुखर्जी यांनी सांगितले, सध्या दिवसाला २०० -२५० लाभार्थी दक्षता मात्रा मोहिमेसाठी येत आहे. येत्या आठवड्यात हा प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत ७५०० लस मात्रांचा साठा नव्याने खरेदी करण्यात येत आहे.