नवी दिल्ली : एप्रिल महिन्यात देशांतर्गत बाजारात कार विक्री १०.१५ टक्क्यांनी घटली. वर्षातील एकाच महिन्यात पहिल्यांदाच एवढी मोठी घट झाली आहे. सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या (सियाम) आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये देशभरात १,३५,४३३ कारची विक्री झाली. मागील वर्षी एप्रिल महिन्यात १,५०,७३७ कारची विक्री झाली होती. सियामचे उपमहाव्यवस्थापक सुगातो सेन म्हणाले की, मे २०१३ नंतर ही सर्वाधिक घसरण होय. मे २०१३ मध्ये कार विक्रीत एकूण ११.७ टक्के घट झाली होती. अर्थसंकल्पात उत्पाद शुल्क कपात केल्याखेरीजही कार विक्रीत सतत घट होत आहे. बाजारातील नकारात्मक धारणा बदलण्यास आम्ही अयशस्वी झालो, असे सेन म्हणाले. चालू आर्थिक वर्षाच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी छोट्या कार, स्कूटर, मोटारसायकल आणि वाणिज्यिक वाहनांचे उत्पाद शुल्क १२ टक्क्यांवरून ८ टक्के केले होते. एसयूव्हीसाठी उत्पाद शुल्क ३० टक्क्यांवरून २४ टक्के करण्यात आले होते. सेन म्हणाले की, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर स्थिती सुधारेल. वाहन क्षेत्रात सुधारणा होण्यासाठी आर्थिक वृद्धीदर ७ टक्क्यांच्या पुढे पाहिजे. मान्सून कमजोर होण्याचे संकेतही वाहन उद्योगाला घातक असल्याचे ते म्हणाले. उत्पाद शुल्क कमी केला असला, तरीही देखभालीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे मुख्यत: छोट्या कार उत्पादक कंपन्यांवर याचा अधिक परिणाम झाला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मारुती सुझुकी इंडियाची देशांतर्गत कार विक्री १४ टक्क्यांनी घटून ६५,७८६ वर पोहोचली. ह्युंदाई मोटर इंडियाच्या कारची विक्री ८.४८ टक्क्यांनी वाढून १३,११० एवढी झाली. ४देशात टाटा मोटर्सच्या कारची विक्री ३६.६१ टक्क्यांनी घटून ५,६५३ वर आली. दुसरीकडे होंडा कार इंडियाची विक्री ३०.२१ टक्क्यांनी वाढून १०,९७७ वर पोहोचली.
एप्रिलमध्ये हीरो मोटोकॉर्पच्या वाहनांची विक्री १४.५७ टक्क्यांनी वाढून ४,९५,७०१ वर पोहोचली. यादरम्यान बजाज आॅटोच्या विक्रीत १६.४९ टक्क्यांची घट झाली. ४ होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाची विक्री १३.७१ टक्क्यांनी वाढून १,३१,३७८ वर पोहोचली.
दुचाकी वाहनांची विक्री ११.६७ टक्क्यांनी वाढून १३,०४,४४७ एवढी झाली. दरम्यान, मोटारसायकलींची विक्री ८.०६ टक्क्यांनी वाढून ९,११,९०८ वर पोहोचली. ४ एप्रिल महिन्यात स्कूटर क्षेत्रात जबरदस्त २६.०८ टक्क्यांची वाढ झाली. या काळात कंपन्यांनी एकूण ३,२९,६८० स्कूटरची विक्री केली.