ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 26 - उजनी धरणातून भीमा नदीपात्रात बुधवारी सोडलेले पाणी रविवारी रात्री १० वाजता गुरसाळे (ता. पंढरपूर) बंधाऱ्यात पोहोचले होते. ते सोमवारी दुपारी 3.15 मिनिटांनी पंढरपुरात पोहोचले आहे. सोलापूर शहराला पाणीटंचाई निर्माण झाल्याने उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. सध्या भीमा नदीपात्रात 7100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वाहत आहे. पंढरपूर येथील नदीपात्रात अवैध वाळू चोरीमुळे खोलवर खड्डे पडले होते. ते खड्डे रविवारी दिवसभर पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने दोन जेसीबी मशीनच्या सहाय्याने बुजविण्यात आले. त्यामुळे सोमवारी दुपारी 3.15 वाजता पोहोचलेले पाणी गोपाळपूर बंधारा भरून सायंकाळी 6 वाजेपर्यंत पुढे सरकू लागले होते. गोपाळपूर बंधारा भरल्याने पाण्याचा फुगवटा वाढत असून, नदीपात्रातील पुंडलिक मंदिराच्या पायरीजवळ पाणी आले आहे. नदीतील भीमाशंकरसह अन्य छोटी मंदिरे पाण्यात आहेत.
पंढरीत पोहोचले उजनीचे पाणी
By admin | Published: December 26, 2016 9:00 PM