ऑनलाइन लोकमत
भाईंदर, दि. 8 - गेल्या पाच वर्षांत वायू प्रदूषणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाणही वाढले आहे. देशात दरवर्षी फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण 20 टक्के एवढे असल्याची भीती 'चेस्ट रिसर्च फाऊंडेशन'तर्फे व्यक्त करण्यात आली आहे, अशी माहिती मीरा रोडमधील वोक्हार्ड रुग्णालयातील कर्करोग तज्ञ्ज डॉ. उमा डांगी यांनी दिली आहे.
'इंटरनॅशनल असोसिएशन फॉर स्टडी ऑफ लंग कॅन्सर' या संस्थेमार्फत संपूर्ण जगात नोव्हेंबर हा महिना फुप्फुसाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी पाळला जातो. वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण हा जागतिक स्तरावरील चिंतेचा विषय बनला आहे. या धुरामुळे श्वसनाचे रोग, टी.बी.सारखे दुर्धर आजार होतात. तसेच स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगासारखा रोग होतो, असे अमेरिकेतील `द सायलेन्ट स्पिंग इन्स्टिटय़ूट’ च्या संशोधनातील निष्कर्षात नमूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
आजमितीला जगात वाढत्या वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा आकडा दरवर्षी वाढत आहे. या आजारामुळे दरवर्षी जगभरात 16 लाख लोक मृत्यूमुखी पडतात. त्यापैकी सन 2015 मध्ये भारतात 1 लाख 10 हजार लोकं कर्करोगाला बळी पडले आहेत. तत्पूर्वी हाच आकडा 2009 मध्ये 65 हजार तर 2013 मध्ये 90 हजार इतका होता. यावरून भारतात दरवर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये 20 टक्क्यांनी वाढ होत असल्याचे डॉ. डांगी यांनी सांगितले. जळणासाठी वापरले जाणारे रॉकेल, लाकूड , पेट्रोल ,डिझेल यांसारख्या इंधनातून निघणारा धूर , फटाक्यांचा धूर, कारखान्यातून सोडला जाणारा प्रदूषित वायू, धूळ, दूषित गॅस, स्वयंपाकघरातील कोंदट वातावरणामुळे कोंडला जाणारा धूर, विडी व सिगारेट जाळल्यामुळे होणारा धूर, शेतीसाठी वापरली जाणारी रासायनिक खते, प्राण्यांची विष्ठा व मूत्र यातून उत्सर्जित होणारा अमोनिया हे घटक मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित करतात. हवा प्रदूषणाने माणसाच्या श्वसन संस्थेत बिघाड निर्माण होतो.
त्यातून शरीरात घुसणारी अस्वच्छ हवा फुप्फुसाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरते. कर्करोगाच्या सर्व प्रकारांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग सर्वात घातक असतो. तज्ज्ञांच्या पाहणीनुसार फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या 90 टक्के रुग्णांना ही व्याधी धूम्रपानामुळे जडलेली असते. तंबाखूच्या कोणत्याही प्रकारातील सेवन अथवा सिगारेटच्या धुरामुळे निर्व्यसनी लोकं कर्करोगाच्या जाळ्यात ओढले जातात.सिगारेटच्या धुरात कार्सिनोजेन्सचे प्रमाण खूप असल्याने तो अतिशय घातक ठरतो. हल्ली धूम्रपानाचे प्रमाण वाढत असून महिलाही या व्यसनाला बळी पडत आहेत. यात बहुतांशी उच्चभ्रू महिलांचा समावेश असतो. डिझेलच्या धुरामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोगविषयक अभ्यास करणाऱ्या विभागाने 12 जून 2015 रोजी काढला आहे.
वाहन प्रदूषण टाळण्यासाठी महाविद्यालयात जसे रोज डे, सारी डे व ट्रेडिशनल डे साजरे करतात तसे आठवडय़ातील एक दिवस 'नो वेहिकल डे' साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले. खराब हवा अथवा धुळ शरीरात जाऊ नये, यासाठी तोंडाला मास्क बांधणे अथवा अशा वातावरणात जाणे टाळावे. जगात दरवर्षी हवेच्या प्रदूषणाने अकाली मरण पावणाऱ्यांची संख्या 30 लाख असून ती एचआयव्ही अथवा मलेरियाच्या संसर्गाने मरण पावणाऱ्यांपेक्षा पाच लाखाने अधिक आहे. वायू प्रदूषण कायम राहिल्यास सन 2050 पर्यंत हवेच्या प्रदूषणाने बळी जाणाऱ्यांची संख्या 66 लाखांपर्यंत जाईल; असा इशारा ‘जर्नल नेचर’ या ब्रिटीश नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अहवालात देण्यात आल्याचेही डॉ. डांगी यांनी सांगितले.