पुणे : बाणेर येथे सोमवारी दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातातील लेकीपाठोपाठ आईचाही मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने कार चालविल्याप्रकरणी मोटारचालक महिला सुजाता जयप्रकाश श्रॉफ ( रा. शिवाजीनगर) हिला अटक करून चतु:शृंगी पोलिसांनी मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांच्या न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर श्रॉफ हिची जामिनावर सुटका केली . बाणेर येथे दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच जणांना भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने धडक दिली होती. यामध्ये तीन वर्षांची बालिका ईशा हिचा कालच मृत्यू झाला होता. आज उपचारादरम्यान तिची आई पूजा अजयकुमार विश्वकर्मा (वय २४) हिचा सोमवारी उशिरा मृत्यू झाला आहे. श्रॉफ ही एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी आहे. सोमवारी दुपारी श्रॉफ हिच्या मोटारीने दुभाजकावर थांबलेल्या पाच जणांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर सुजाता श्रॉफ पळून गेली होती. सायंकाळनंतर शहरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये ती दाखल झाली. निष्काळजीपणे मोटार चालविल्याप्रकरणी मंगळवारी सकाळी नऊ वाजता तिला अटक करण्यात आली आणि त्यानंतर दुपारी तीन वाजता तिला न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांनी १५ हजार रुपयांच्या जामिनावर तिची सुटका केली. (प्रतिनिधी)
लेकीपाठोपाठ आईचाही मृत्यू
By admin | Published: April 19, 2017 4:28 AM