पुणे : सोशल मीडियातून, जाहीर भाषणांमधून लोकशाही आणि मतदानाबद्दलची आस्था मांडणाऱ्या माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची लोकशाहीबद्दलची तळमळ पोकळ असल्याचे दिसून आले आहे. तरुणांनी मतदान करावे, यासाठी अथकपणे भाषणे ठोकणाऱ्या देशमुखांचे शब्द म्हणजे केवळ ‘बापुडा वारा’ असावा, असे त्यांच्या ताज्या ‘फेसबुक पोस्ट’वरुन स्पष्ट झाले आहे. या ‘तोंडपाटिलकी’ विरुद्ध नेटीझन्सनी देशमुखांना झोडपून काढले आहे.
‘राजा तू चुकत आहेस,’ या शब्दात बडोद्याच्या साहित्य संमेलनातून सरकारला खडे बोल सुनावणारे देशमुख स्वत: मात्र सपत्नीक तीन आठवड्यांच्या युरोप दौºयावर गेले आहेत. यामुळे मतदानाला देशमुख स्वत:च गैरहजर राहण्याची शक्यता आहे.
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन युरोपच्या दिशेने उड्डाण करण्यापूर्वीची छायाचित्रे देशमुख यांनी ९ एप्रिलच्या मध्यरात्री त्यांच्या ‘फेसबुक वॉल’वर प्रसिद्ध केली आहेत. ही सहल तीन आठवड्यांची असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे. त्यामुळे देशमुख ३० एप्रिल रोजी परतणार असल्याचे दिसते. तोपर्यंत महाराष्ट्रातल्या तीनही टप्प्यांमधले मतदान आटोपणार आहे.
‘‘मतदान नाही करणार?? मग लोकशाही वर कस काय बोलणार? ?? का फक्त नौटंकीच करायची...’’ असा सवाल ‘नेटीझन्स’नी देशमुखांना विचारला आहे.