- राहुल गायकवाडपुणे - पुण्यात सकाळपासून कर्णबधिर विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. पुण्यातील समाजकल्याण कार्यालयाजवळ हे आंदोलक आले असताना, पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यावेळी अनेक आंदोलक जखमी झाले. आपल्या मागण्यांवर आंदोलक ठाम होते. संध्याकाळपर्यंत आंदोलक समाजकल्याण कार्यालयाजवळ बसून होते. आजूबाजूला पाण्याची आणि खाण्याची कुठलीही सोय नव्हती. संध्याकाळपर्यंत हे आंदोलक भुकेले होते. त्यांची अवस्था पाहून येथे राहणाऱ्या माया पाडळे यांनी या आंदोलकांसाठी चहाची सोय केली. तसेच या आंदोलकांना फळे आणि इतर खाण्याचे पदार्थ दिले.
कर्णबधिर विद्यार्थ्यांनी पुण्यातील समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा काढला, पुढे हे आंदोलक आपल्या मागण्या घेऊन मुंबईला जाणार होते. आंदोलकांकडे ठिय्या आंदोलन करण्याची परवानगी होती परंतु मोर्चा काढण्याची परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी हा मोर्चा समाजकल्याण कार्यालयाच्या अलीकडेच अडवला. यावेळी मोर्चेकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांनी बॅरिगेट लावले होते, आंदोलकांचे नेते मोरे यांनी हातवारे करून आंदोलकांना चिथावल्याचे बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुजावर यांचे म्हणणे होते. पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये काही आंदोलक जखमी झाले.
दरम्यान आंदोलकांनी त्याच जागी ठिय्या मांडला. संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू असल्याने अनेकांना भूक लागली होती. जवळ पाण्याची, चहाची कुठलीही सोय नव्हती. या आंदोलकांची अवस्था पाहून येथे राहणाऱ्या माया पाडळे यांनी त्यांच्यासाठी चहा केला. तसेच खाण्यासाठी फळे आणि इतर पदार्थ दिले. आंदोलकांनी सुद्धा त्यांचे मनापासून आभार मानले. प्रशासनाला या आंदोलकांचा आवाज ऐकू गेला नसला तरी सामान्य नागरिक असलेल्या माया यांनी माणुसकी दाखवून दिली.