Dhananjay Munde Walmik Karad Anjali Damania: संतोष देशमुख हत्या प्रकरणासह तीन गुन्ह्यांमध्ये वाल्मीक कराडला मुख्य आरोपी करण्यात आहे. त्यामुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे चांगेलच अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या राजीनामच्या मागणीने पुन्हा जोर धरला असून, करूणा मुंडे-शर्मा यांनी त्यांच्या राजीनाम्याबद्दल मोठा दावा केला आहे. त्यावर आता अंजली दमानियांनीही भूमिका मांडतांना सूचक इशारा दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'३ मार्च २०२५ रोजी राजीनामा होणार', या करुणा मुंडे-शर्मा यांच्या फेसबुक पोस्टने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख हत्या, २ कोटींची खंडणी आणि अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केले. त्यात वाल्मीक कराडच प्रमुख म्होरक्या असल्याचे तपासाअंती म्हटले आहे. त्यानंतर करुणा मुंडे-शर्मा यांनी ही पोस्ट केली आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे याचा राजीनामा आधीच लिहून घेतला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
अंजली दमानिया धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल काय बोलल्या?
करुणा मुंडे-शर्मा यांनी केलेल्या पोस्टबद्दल अंजली दमानिया यांनीही भाष्य केले आहे.
"राजीनामा झालाच पाहिजे. आता करुणा मुंडे कुठून म्हणाल्यात मला माहिती नाही. त्यांच्या माहितीचा स्त्रोत काय आहे, माहिती नाही. झाला तर अति उत्तम. सगळेच त्याची आतुरतेने वाट बघताहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की झालाच पाहिजेत. नाही झाला, तर माझे पुढचे पाऊल काय असणार आहे, ते मी उद्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेन", असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.
धनंजय मुंडे वाल्मीक कराडबद्दल काय बोलले होते?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडकडे बोट दाखवले जात होते. हे प्रकरण समोर आले, त्यानंतर धनंजय मुंडे यांना माध्यमांनी त्यांच्यासोबत असलेल्या संबंधाबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर मुंडे म्हणाले होते की, "वाल्मीक कराड माझ्या जवळचे आहेत. ते मी नाकारणार नाही", असे म्हणत त्यांनी कराड निकटवर्तीय असल्याच्या चर्चांना दुजोरा दिला होता.