- संजय कदम (वाठार, जि़सातारा)
ऊस, आले या पिकांना पारंपरिक पद्धतीने खते दिल्यास बऱ्याच वेळा खत वाया जाते़ तसेच हे खत पिकांवर पडून करपण्याची शक्यता असते़ हे लक्षात घेऊन कोरेगाव तालुक्यातील बिचकुले येथील विठ्ठल बाजीराव पवार या शेतकऱ्याने ऊस, आले या पिकांना भेसळ डोस देण्यासाठी खत पेरणी यंत्र बनविले़ त्यासाठी अवघा १५० रुपये खर्च झाला़ यामुळे उत्पन्नातही मोठी वाढ झाली़ ऊस, आले या पिकांना पारंपरिक पद्धतीने खते दिल्यास अनेक वेळा खत वाया जातो़ याशिवाय पारंपरिक पद्धतीने विस्कटून टाकलेला खतही पिकाच्या मुळापर्यंत पोहोचत नाही़ यासाठी साध्या पद्धतीने बनविलेल्या बादलीद्वारे खत दिल्यास वेळेची बचत होऊन पिकाच्या मुळापर्यंत पोहोचते़ शेतकरी विठ्ठलराव पवार गेल्या आठ वर्षांपासून आल्याची शेती करीत आहेत़ सध्या चुनखडीच्या जमिनीत सीताफळाच्या मध्ये त्यांनी आल्याचे अंतरपीक सिंचनाद्वारे घेतले आहे़ आले हे इतर पिकांच्या तुलनेत निश्चितच फायदेशीर असून, हमखास उत्पन्न देणारे आहे़ फक्त यासाठी त्याची योग्य पद्धतीने जोपासना आवश्यक असते, असे पवार यांचे मत आहे़
ते म्हणतात, प्रत्येक वर्षी मी किमान सहा ते सात एकर औरंगाबादी जातीचे आले पीक घेतो़ या माध्यमातून मला एकरी खर्च वजा जाता चार ते पाच लाखांचा नफा होतो़ आले पिकासाठी किमान एक ते दोन वेळा भेसळ डोस द्यावा लागतो़ हा डोस देताना पारंपरिक पद्धतीने खते दिल्यास ती पिकाच्या मुळापर्यंत पोहोचत नाहीत़ यासाठी यंदा भेसळ डोस देण्यासाठी १० लिटरची मोकळी बादली घेतली़ त्याला एक न्हाणी ट्रॅप, बॉल व्हॉल्व्ह व एक फूट तुकडा घेऊन एक उपकरण तयार केले़ या यंत्रामधून खते सोडल्याने ती पिकांच्या मुळापर्यंत पोहोचली़ यंत्रासाठी केवळ १५० रुपये खर्च आला़ सर्वांनाच हे यंत्र घरी बनविण्यास सोपे आहे़ आम्ही सध्या ऊस आणि आले या पिकांना याच यंत्राद्वारे खत सोडत असल्याचे पवार यांनी सांगितले़.