ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - दादरची तशी वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. शिवसेना भवन, शिवाजी पार्क, शिवाजी नाट्य मंदिर, प्लाझा टॉकीज अशी अनेक महत्वाची ठिकाणं येथे आहेत जी दादरची ओळख स्पष्टपणे सांगत असतात. यामध्ये असलेलं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे कबुतरखाना. दादर स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडलो की पहिल्याच चौकात हा कबुतरखाना दिसतो. हा कबुतरखाना माहित नाही अशी व्यक्ती मुंबईत सापडणे कठीणच. मात्र दादरची ओळख असलेला हा कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र लिहून हा कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली आहे. कबुतरांमुळे दादरमधील अनेक रहिवासी, विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांना श्वसनाचे विकार होत असल्याची तक्रार या पत्रातून करण्यात आली आहे. तसंच पक्ष्यांची विष्ठा आणि पिसांमुळे अनेक इमारतींच्या खिडक्या खराब झाल्याचंही पत्रात म्हटलं आहे.
ग्रेड 2 ची हेरिटेज वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना 1933 मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून बांधण्यात आला होता. अनेकांनी त्याठिकाणी कबुतरांना दाणे देण्यास सुरुवात केली. आतातर तिथे कबुतरांसाठी खाण्याची आणि पिण्याची विशेष सोयही करण्यात आली आहे. त्याठिकाणी येणारे अनेक प्रवासी दाणे विकत घेऊन कबुतरांना टाकत असतात. तसंच जवळच असणा-या मंदिरांमध्ये येणारे भाविकही धार्मिक भावना जपण्याच्या हेतूने दाणे टाकत असतात.
मनसेच्या या मागणीला भाजपाने मात्र विरोध केला आहे. कबुतरखाना हा मुंबई शहराच्या इतिहास आणि वारशाचा भाग असल्याचं सांगत भाजपाने कबुतरखाना बंद करण्यास विरोध केला आहे. महापालिकेकडून मात्र अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.