अकलूज - Jaysingh Mohite Patil on BJP ( Marathi News ) धैर्यशील मोहिते पाटील आणि कार्यकर्ते यांचा तिकिटासाठी आग्रह होता. तेव्हा वरिष्ठ मंडळींनी त्यांना थांबायला सांगितले असते तर आम्ही थांबवलं असतं, देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा होत्या. त्यांनी तुम्ही थांबा असं म्हटलं असते तरी थांबलो असतो असं विधान जयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं की, रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत येणार नाही, ते भाजपातच राहतील. त्यांना भाजपाने मदत केलीय. त्यामुळे विरोधी पक्षाकडून त्यांनी प्रचार केला तरी काहीही हरकत नाही. आम्ही जनतेच्या जीवावर राजकारण करणारे नेते, आम्हाला कुणाची भीती नाही. १४ एप्रिलला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतोय. १६ तारखेला उमेदवारीचा अर्ज दाखल करणार असून त्याचदिवशी प्रचारसभा होईल. लोकसभेची निवडणूक लागली, २ महिन्यापासून तिकीटासाठी प्रयत्न सुरू होते. माळशिरस, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माढा, करमाळा तालुक्यातील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी माघार घ्यायची नाही असा आग्रह धरला. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली जात आहे. त्यातून शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनीही होकार दिला असं त्यांनी म्हटलं.
तसेच आम्ही थांबलो असतो तरी आमचे कार्यकर्ते भाजपामागे गेले नसते, शरद पवारांबाबत जी सहानुभूती आहे त्यांच्या तुतारीवर शिक्के मारले असते. सोलापूर, माढा, बारामती या जागांवर फटका बसणार आहे. २८ ते ३० जागा भाजपा येतील असं वाटतं, ग्रामीण भागात भाजपाविरोधात नाराजी आहे. हा निर्णय आमच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे आम्ही घेतला नाही असंही जयसिंह मोहिते पाटलांनी म्हटलं.
माढा लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीवरून मोहिते पाटील नाराज झाले. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी गुरुवारी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर तातडीनं धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपाचा राजीनामा दिला. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र मोहिते पाटलांच्या नाराजीवर जर देवेंद्र फडणवीसांनी संपर्क साधला असता तर ही वेळ आली नसती असं विधान जयसिंह मोहिते पाटील यांनी केले.