सचिन लाड --सांगली माधवनगर... सांगलीपासून चार किलोमीटर अंतरावरचे गाव... गावाबाहेर रेल्वेस्थानक आहे. दुर्गम भागातील अतिशय दूरवस्थेतील एखाद्या स्थानकालाही लाजविण्याचे काम आता या स्थानकाने सुरू केले आहे. स्थानकाचे दरवाजे, खिडक्या, पत्रे पळवून नेले आहेत. तिकीट विक्रेत्यास बसायलाही जागाही नाही. प्रवाशांना बसायला ठेवलेले कट्टेही फोडले आहेत. त्यामुळे तिकीट विक्रेत्यास एखादा दगड शोधून किंवा मोडकळीस आलेल्या कट्ट्यावर बसून तिकीट विक्री करावी लागत आहे. स्थानकाचा तर केवळ सांगाडाच शिल्लक आहे.माधवनगर रेल्वेस्थानक जकात नाक्यापासून दोन-अडीच किलोमीटरवर असल्याने, प्रवाशांसाठी ते नेहमीच गैरसोयीचे ठरले आहे. येथे केवळ सकाळची कोल्हापूर-पुणे, सातारा-कोल्हापूर व सायंकाळची पुणे-कोल्हापूर आणि कोल्हापूर-पुणे या चारच पॅसेंजर थांबतात. पॅसेंजरला तिकीट दर कमी असल्याने या रेल्वेना प्रवाशांची गर्दी असते. स्थानकाची स्वतंत्र इमारत आहे. यामध्ये स्टेशन मास्तर, तिकीट विक्रेता यांच्यासाठी दोन स्वतंत्र खोल्या व प्रवाशांना बसण्यासाठी प्रतीक्षालय आहे. तिकीट विक्रेता पूर्वीपासून येथे पॅसेंजर रेल्वे येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर यायचा. तिकीट दिले; रेल्वे येऊन गेली की, विक्रेता निघून जायचा. त्यामुळे अन्य वेळी हे स्थानक बेवारस असते. हीच संधी साधून चोरट्यांनी स्थानकात धुमाकूळ घातला. खिडक्या, दरवाजे, छताचे पत्रे पळवून नेले. सिमेंटची बाकडी होती. तीही फोडण्यात आली आहेत. पावसाळ्यात तर प्रवाशांना पावसातच रेल्वेची प्रतीक्षा करीत उभे रहावे लागते. तिकीट विक्रेता आजही नेहमीप्रमाणे रेल्वे येण्यापूर्वी अर्धा तास अगोदर येतो. रविवारी सायंकाळी ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने स्थानकास भेट दिली. त्यावेळी दोन महिलांसह सहा प्रवासी उभे होते. ‘तिकीट द्यायला कोणी येतं का?’ अशी त्यांच्याकडे चौकशी केली असता, ‘मास्तर आता एवढ्यात येईल’, असे या प्रवाशांनी सांगितले. पुण्याहून कोल्हापूरला जाणारी पॅसेंजर येणार होती. तिकीट विक्रेता साडेपाच वाजता आला. स्थानकात बसण्याची कोणतीच सुविधा शिल्लक नसल्याने, विक्रेता तुटक्या-फुटक्या बाकावर बसला. लगेच प्रवासी त्याच्याजवळ गेले. सर्वांनी तिकीट काढले. त्यानंतर या प्रतिनिधीने विक्रेत्याशी संवाद साधला असता, प्रकाश जावीर असे त्याचे नाव समजले. ते मूळचे सांगोल्याचे आहेत. तिकीट विक्रीचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराकडे ते नोकरी करतात. जावीर यांच्या हातात एक बॅग होती. बॅगेत प्लॅस्टिकचा बॉक्स होता. त्यामध्ये पूर्वीची जुन्या पद्धतीची पुठ्ठ्याची तिकिटे होती. केवळ रोजच्या तारखेचा शिक्का मारून तिकीट दिले जाते. सर्व स्थानके संगणकीकृत झाली आहेत. सर्वत्र तिकीट संगणकावर दिले जाते. पण या स्थानकात पुठ्ठ्याची तिकिटे दिली जातात. रेल्वे येण्यापूर्वी सकाळी दोन तास आणि सायंकाळी एक तास या वेळेतच तो तिकीट विक्री करून जातो.लाखाचा गल्ला पुणे आणि कोल्हापूर मार्गावर जाण्यासाठी प्रवाशांची दररोज सकाळी गर्दी असते. अडीच ते तीन हजार रुपयांची तिकीट विक्री येथे होते. सायंकाळी दोन-अडीचशे रुपयांची तिकीट विक्री होेते. यातून महिन्याला एक लाख रुपये गल्ला जमा होतो. या स्थानकाच्यादृष्टीने उत्पन्न चांगले असूनही रेल्वे प्रशासन हे स्थानक सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न करीत नसल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
माधवनगर रेल्वे स्थानकाचा कारभार कट्ट्यावरून
By admin | Published: January 12, 2016 12:17 AM