लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्त्री भ्रूणहत्या, महिलांचा सन्मान, कुटुंब नियोजन याची आता मोठ्याने चर्चा होते; परंतु ६० वर्षांपूर्वी माधवराव शिंदे यांनी या विषयावरचे गंभीर चित्रपट दिले म्हणूनच माधवराव हे काळाच्या पुढचे पाहणारे दिग्दर्शक ठरतात, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केले. चित्रसाधक माधव शिंदे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शिंदे कुटुंबीय, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर श्रीकांत देसाई, माधव शिंदे यांच्या कन्या छाया माने, माया देसाई, चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर व फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी उपस्थित होते. आशा काळे म्हणाल्या, माझ्या घरी माधवरावांचं येणं होतं. वडिलांचा त्यांचा स्नेह होता. त्यांनी मला त्यांच्या ‘संसार’ चित्रपटासाठी नायिका म्हणून निवडलं आणि मला याचा फार आनंद झाला. अतिशय कमी बोलणारे, नम्रतेने वागणारे, कलावंतांची काळजी घेणारे, अशी माधवरावांची अनेक रूपं मी पाहिली आहेत. त्यांच्या ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट मी अनेकवेळा पाहिला. त्यातील ‘आली हसत पहिली रात’ हे गाणंही आज मला जस्संच्या तस्सं आठवतं. माधवरावांनी ‘संसार’मध्ये माझी मुलगी म्हणून बालकलाकार ऊर्मिला मातोंडकर हिची निवड केली होती जिने नंतर हिंदीमध्ये आपले नाव केले. प्रास्ताविकात चंद्रकांत जोशी म्हणाले, राष्ट्रपती पारितोषिकापर्यंत धडक मारण्याची कामगिरी केलेले शिंदे यांचे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मोठे योगदान आहे. मात्र, नव्या पिढीला ते कोण होते हे कळावं म्हणूनच त्यांच्या कुटुंबीयांनी हे धाडस स्वीकारलं. माधवरावांच्या १९४२ साली प्रसिद्ध झालेल्या बातमीची कात्रणेही त्यांच्या कुटुंबीयांनी जपून ठेवली आहेत. हे त्यांचं योगदान कोल्हापूरसाठी मोलाचं ठरलं आहे. शिंदे यांच्या ‘धर्मकन्या’ चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलेल्या आणि ‘साखर उद्योगातील संशोधक’ म्हणून ज्यांना मान्यता आहे अशा वसुधा केसकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. शिंदे यांच्या चित्रपटासाठी काळाची फुटपट्टी वापरावी लागेल, अशा शब्दांत त्यांनी शिंदे यांच्या चित्रपटाचे महत्त्व अधोरेखित केलं. राहुल देसाई यांनी स्वागत केले तर फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चित्रपटसृष्टीतील भालचंद्र कुलकर्णी, यशवंत भालकर, सुभाष भुर्के यांच्यासह अनिता काळे व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. तुम्ही कशाला काळजी करतायावेळी ‘संसार’ चित्रपटावेळच्या चित्रीकरणातील किस्सा आशातार्इंनी सांगितला. त्या म्हणाल्या, या चित्रपटातील नायक यशवंत दत्त मला कानफाटीत मारतात आणि मी शिलाई मशीनवर कोसळते आणि तेथेच माझा मृत्यू होतो, असे चित्रीकरण करायचे होते. मला न मारताही शॉट कसा चांगला होईल याबाबत यशवंत दत्त माझ्याशी बोलत होते. काहीवेळा खरोखरंचा प्रसंग वाटावा म्हणून मारायचे का, अशीही चर्चा होती तेव्हा अतिशय काळजीने माधवरावांनी यशवंत दत्तना विचारलं, तुम्ही आशाला कसं मारणार? तिला लागलं तर. ते अस्वस्थ झाले. शेवटी मीच त्यांना म्हणाले, अहो मार मी खाणार आहे तर तुम्ही का अस्वस्थ होता? परंतु कलावंतांची काळजी घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. कोल्हापूरच्या माणसांनीच मला घडवलंकोल्हापूरच्या आठवणींनी भारावलेल्या आशातार्इंनी यावेळी माहेरच्या लोकांनी कितीही कौतुक केलं तरी ते अपुरंच वाटतं असं सांगतानाच माझे गुरू चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, बाबूराव पेंढारकर आणि माधवराव शिंदे या तिघांनी मला घडवलं म्हणूनच आशा काळे गेली ५० वर्षे या चित्रपटसृष्टीमध्ये खंबीरपणे उभी असल्याचे सांगत टाळ्या घेतल्या.
‘माधवराव, काळाच्या पुढचं पाहणारे दिग्दर्शक’
By admin | Published: May 15, 2017 1:10 AM