ऑलाइन लोकमत/ बाळासाहेब खेडकर
अहमदनगर, दि. 04 - चित्रपट अभिनेत्री मधु कांबीकर यांनी दिपावली व भाऊबीज आपल्या कांबी (ता. शेवगाव) या मूळ गावी साजरी केली. जुन्या बालपणाच्या मित्र मैत्रिणींसह वडीलधाऱ्या ग्रामस्थांबरोबर गप्पागोष्टींचा फड रंगवित जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी यावर्षी गावाकडे दिवाळी साजरी केली. ‘लोकमत दीपोत्सव’ दिवाळी अंकाचे वाचन करून ‘लोकमत’ चा माझ्या जीवनात मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. त्यांचे लहानपण कांबी गावातच गेले. गावातील नाटकातून सुरु केलेल्या अभिनयातून त्या पुढे सिनेसृष्टीत पोहोचल्या. गाव सोडावे लागले तरी गावाचा अभिमान कायम ठेवला. सुखदु:खातही गावाचा संपर्क कायम असल्याने यंदा त्यांनी बालपणाच्या मूळ गावी दिवाळी साजरी करण्याचे ठरवून नव्वद वर्षाच्या वृध्द मातु:श्री कलाबाई, अभियंता मुलगा प्रितम, सून शीतल नातू यश, ओम यांच्यासह दीपावलीपूर्वीच कांबी गाव गाठले. दुमजली माळवदाच्या घरात मुक्काम केला. मधुबाई सातत्याने गावी येत असल्याने ग्रामस्थांचे त्यांच्याविषयीचे प्रेम कायम असल्याचे दिसून आले. त्यांच्या बालपणच्या जिवलग मैत्रीण आसराबाई सांगळे या उमापूर (ता. गेवराई) येथून खास भेटायला आल्या होत्या. त्यांच्याशी हितगुज करताना दोघींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पासष्टीतील वर्गमित्र ताराचंद भिसे हे त्यांच्या डॉक्टर मुलगा व पत्नीसह आले होते. सुधाकर कुऱ्हे, बाबू जाधव, हरी मस्के, हभप लक्ष्मण बाठे महाराज यांच्यासह युवा पिढीतील अॅड. सतीश पारनेरे, लहू पाटील मडके, रमेश दुसंगे, मयूर हुंडेकरी डॉ. अरुण भिसे आदी ग्रामस्थांशी मनमोकळ्या गप्पागोष्टी करुन विविध जुन्या आठवणींना उजाळा दिला. स्वमालकीच्या काळ्या कसदार शेतजमिनीत फेरफटका मारला.
गावावर अत्यंत प्रेम असल्याने गावच कुटुंब मानून कांबीचे नाव झळकले गेले त्याच बरोबर कै रामभाऊ मस्के या नावाने वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचनालय सुरु करून स्वखर्चाने भव्य इमारत उभारली. त्याच बरोबर पाणीपुरवठा योजनांसह विविध सार्वजनिक विकासात्मक कामाला वैयक्तिक हातभार लावला. शेवटच्या श्वासापर्यंत गावाचा अभिमान राहणार आहे.
- मधु कांबीकर