Sambhaji Raje Chhatrapati News: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील घडलेल्या राजकीय नाट्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सतेज पाटील नाराज झाले. या सगळ्या प्रकारानंतर त्यांना अश्रुही अनावर झाले. कोल्हापूरमध्ये घडलेल्या राजकीय घटनेबद्दल संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांची भूमिका मांडली.
संभाजीराजे छत्रपती पुण्यात बोलताना म्हणाले, "छत्रपती शाहू महाराज या घराण्याचे प्रमुख आहेत. ते कोल्हापूर लोकसभेचे खासदार आहेत, म्हणून त्यांनी घराण्याबाबत जी काही प्रतिक्रिया दिली आहे. ती मला सुद्धा लागू होते."
"शाहू महाराजांनी लाईन ठरवून दिलीये"
"काही गोष्टी खासगी ठेवल्या पाहिजेत. शेवटी आमचं कुटुंब आहे. मी सुद्धा त्या कुटुंबाचा घटक आहे. पण, जे काही घडलं, त्याबद्दल आम्हालाही वाईट वाटतं. तसं घडायला नको होतं. पण, शेवटी जी शाहू महाराजांनी लाईन दिली, ती आम्हाला लागू आहे", असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
"शाहू महाराजांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे. मला जास्त माहिती नाही. कारण या घडामोडी घडल्या, त्यावेळी मी नागपुरला होतो. परिवर्तन महाशक्तीची पत्रकार परिषद त्यावेळीच सुरू होती. मला सुद्धा तो एक धक्काच होता. या अचानक गोष्टी घडल्या. अशा गोष्टी पूर्वनियोजितपणे होऊ शकत नाही. आमचं छत्रपती घराणं असं करू शकत नाही", अशी भूमिका संभाजीराजेंनी मांडली.