सकाळी दहाच्या सुमारास महाराष्ट्राची एसटी बस मध्य प्रदेशमधील नर्मदा नदीवरील पुलावरून खोल नदीपात्रात कोसळली. यामध्ये आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पाच मृतदेहांची ओळख पटल्याचे सांगितले जात आहे. यापैकी तिघे जळगावचे तर दोन राजस्थानचे आहेत.
Narmada River ST Bus Accident: एसटी बस अपघात: आठ जणांची ओळख पटली; मृतांपैकी पाच जण महाराष्ट्रातील
एसटी बसमधून सुमारे ५० ते ५५ प्रवासी प्रवास करत होते. यापैकी १५ जणांना वाचविण्यात यश आले आहे. उर्वरित प्रवाशांचा शोध सुरु असून क्रेनने बस नदीपात्राबाहेर काढण्यात आली आहे. एसटी प्रशासनाने हेल्पलाईन नंबर जारी केला असून 022-23023940 असा हा क्रमांक आहे. दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. जखमींना आवश्यक वैद्यकीय मदत, मृतांची ओळख पटविण्याचे काम करण्यात येत असल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.
मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे हा अपघात घडला. संजय सेतू पुलावर समोरून राँग साईडने वाहन येत होते, या वाहनाशी टक्कर टाळण्य़ासाठी एसटी चालकाने प्रयत्न केला. यावेळी नियंत्रण सुटल्याने कठडा तोडून ही बस २५ फूट खोल नदीपात्रात कोसळली. या बसमध्ये १३ मुले असल्याचे सांगितले जात आहे. काही मृतांची ओळख पटली असली तरी त्यांची नावे अद्याप समजलेली नाहीत.
प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले...बस पाण्यात पडताच काही प्रवाशांनी पोहून पुलाच्या खांबांचा आधार घेतला व जीव वाचविला. यापैकी ५ ते ७ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. बस खाली कोसळली ती थेट पाण्यात न कोसळता खांबाच्या चौथऱ्यावर कोसळली त्यानंतर ती पाण्यात पलटल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. यावेळी ज्यांना पोहायला येत होते, ते बसबाहेर पडले आणि त्यांनी खांबाच्या चौथऱ्याचा आधार घेतला. काहींना वाचविण्याचाही प्रयत्न केला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.