संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कोकणातील देवगडचा हापूस आंबा या नावाखाली मद्रास येथील आंब्याची अकोल्यात सर्रास विक्री होत आहे. अकोला शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मद्रासचा आंबा आला असून, हापूसच्याच नावाने तो चढत्या भावाने खपविला जात आहे. जनता बाजारातील फळविक्रेत्यांची मोठी यंत्रणा यामध्ये गुंतलेली आहे. याचा पर्दाफास अकोल्यात करण्याची गरज निर्माण झाली आहे.फळांचा राजा म्हणून आंब्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर उन्हाळ््यात आंब्यांची मोठी आवक राहते. आंब्याचा पाहुणचार या दिवसात सर्वत्र असतो. प्रत्येक जण आपल्या आवडी आणि ऐपतीनुसार विविध जातींच्या आंबे खरेदीला पसंती देतात. त्यातही विदर्भातील सर्वसामान्य जनतेकडून गावरान आंब्याला मागणी असते; मात्र सातत्याने आमराई कमी झाल्याने ही मागणी पूर्ण करणे अशक्य आहे. त्यामुळे पर्याय म्हणून लोक आता इतर आंब्यांना पसंती देतात. ४० ते ७० रुपये किलोच्या दराने विविध जातींचे आंबे सर्वसाधरणपणे बाजारात उपलब्ध आहेत; मात्र हापूस आंबा चव आणि सुगंधाने प्रसिद्ध असल्याने त्याची श्रीमंती अजून तरी कमी झालेली नाही. हापूस आंबा अजूनही १५० ते १८० रुपये किलो दराने अकोल्याच्या बाजारात विकल्या जात आहेत; मात्र काही ठिकाणी, वरून हापूस सारखे दिसणारे आंबे अकोल्याच्या बाजारपेठेत शंभर रुपयांपर्यंत विकल्या जात आहे. कमी दरात हापूस आंबा मिळत असल्याने अनेक जण या हापूसला पसंती देत आहे. वास्तविक पाहता हा आंबा हापूस नसून, मद्रासचा आंबा आहे. कसे ओळखाल ओरिजनल हापूस?कोकण आणि देवगळ परिसरातील ओरिजन हापूस आंबा ओळखण्यासाठी त्याचा सुगंध आणि चव महत्त्वाची आहे. ओरिजनल हापूसच्या आंब्याचा रस केसरी असतो. त्याचा सुगंध झाकल्यानंतरही दरवळतो; मात्र हापूससारख्या दिसणाऱ्या मद्रास येथील आंब्याचा रस मात्र पिवळसर दिसतो. त्यामुळे ओरिजनल हापूस आंबा ओळखणे अगदी सोपे आहे.विविध जातींचे आंबे अकोल्यातअकोला बाजारपेठेत बादाम, दसेरी, केसर, लंगडा, बैगनपल्ली, पायरी, भागमभाग, तोतापुरी (कलमी), नीलम, गोवा मानकूर, रत्ना, मल्लिका, आम्रपाली, सुवर्णरेखा, मालगीज, मालगोबा, नागीण, भोपळी, बोरशा, हापूस आणि गावरान आदी विविध जातींचे आंबे दाखल झाले आहेत; मात्र सर्वात चविष्ट आणि श्रीमंती असलेल्या आंब्यामध्ये अजूनही हापूसलाच मागणी आहे.
हापूसच्या नावाखाली मद्रासच्या आंब्यांची विक्री
By admin | Published: May 17, 2017 1:56 AM