पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अडीच लाख भाविकांनी पंढरपूर नगरी फुलून गेली. गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासूनच भाविकांनी चंद्रभागेचे पवित्र स्नान करण्यासाठी नदीच्या पात्रात गर्दी केली होती. स्नान झाल्यानंतर अनेक भाविक दर्शन रांगेत जाऊन थांबत होते. तर काही भाविक बाहेरुनच विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतत होते. तर रांगेत थांबलेल्या भाविकांना दर्शनासाठी आठ तासांच्या आसपास कालावधी लागत होता. विठ्ठलाचे पददर्शन एका मिनिटाला ३० भाविक घेत होते.विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक आल्याने पंढरपुरातील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची नित्यपूजा केली. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्यासमवेत नित्यपूजेस उपस्थित राहण्याचा मान दर्शन रांगेतील तानाजी दादू कवाळे (रा. सांगली) यांना मिळाला. रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांनी सपत्नीक केली. (प्रतिनिधी)
‘माघी’साठी अडीच लाख भाविक पंढरीत दाखल
By admin | Published: February 19, 2016 3:41 AM