ऋचिका पालोदकर/ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 3 - तुमच्या पायात असे बूट आहेत की ज्यामुळे तुम्ही कोणत्याही संकटात असाल, तर त्याची माहिती तुमच्या निकटवर्तीयांना ताबडतोब मिळू शकते किंवा त्या बुटांमुळे तुम्ही कोठे आहात, याचा शोध घेणे सोपे होऊ शकते. अशा स्वप्नवत वाटणा-या ‘विथ यु- शू’ बूटांची निर्मिती येथील सतरा वर्षीय युवा संशोधक साहस दिनेश चितलांगे याने केली आहे. शालेय विद्यार्थ्यांचे हरवणे, अपहरण, महिलांवरील अत्याचार यांसारख्या कित्येक प्रकारांमध्ये हे बूट अत्यंत उपयोगी ठरू शकतात. कॉम्प्युटर एडेड डिझाइनची मदत घेऊन साहसने बुटांचे हे मॉडेल तयार केले आहे. सुचना देणारी चिप, माहिती आदान- प्रदान करणारे लवचिक अँटेना, लिथियम आयोन बॅटरी, तसेच चार्जिंग मेकॅनिझमचा वापर करून बनविण्यात आलेले हे बूट सर्वसाधारण बूटांसारखेच दिसतात. या बुटांची निर्मिती अशाप्रकारे करण्यात आली आहे की, बूट घातलेला व्यक्ती संकटकाळी इतर व्यक्तींच्या नकळत एक विशिष्ठ टॅप करून आपला संदेश सहज पाठवू शकतो. या संदेशात तो कोठे आहे, याचा पत्ताही आपोआप पाठवला जातो. तसेच बूट घालणा-या व्यक्तीचे नातेवाईकही शंका आल्यास त्याचा शोध घेऊ शकतात. या दुहेरी उपयोगामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना, लहान मुलांचे हरवणे किंवा अपहरण यांसारख्या गोष्टींना मोठ्या प्रमाणावर आळा बसेल, असे साहसने सांगितले. संरक्षण विभागातही या बुटांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. या बुटांचा वापर करून कंट्रोल रूममधून सैनिकांच्या स्थितीबाबत रणनिती आखणे शक्य होऊ शकते. साहसचे हे तंत्रज्ञान बाजारात आले तर यामुळे नक्कीच एक क्रांती घडू शकते. हे बूट तयार करण्यासाठी त्याला रू. ५००० एवढा खर्च आला. या बुटांना चार्ज केल्यानंतर सात दिवसांपर्यंत त्याची बॅटरी चालते. वायरलेस चार्जर पॅडचा उपयोग करूनही हे बूट चार्ज करता येतात. साहसचे हे ‘विथ यु शू’ आंतरराष्ट्रीय बाजारात सुरक्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी साहसच्या नावे पेटंट तयार करण्यासाठी मदत केली आहे. त्याने कुंडीचा उपयोग करून मिट्टीकुल फ्रीज, सायकलवर बॅटरीचा वापर करून ‘मिनी इ-बाईक’, वॉटर लेव्हल कंट्रोलर, डे-नाईट लाईट सेन्सर, अॅन्टी थेप्ट डोअर अलार्म आदी अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. आय. आय. टी बॉम्बे तर्फे दरवर्षी घेण्यात येणा-या ‘टेक फेस्ट’ स्पर्धेसाठी झोनल लेवल मधे साहस व त्याच्या टीमची निवड झाली आहे.
संकटकाळी वाचवणारे जादुई ‘बूट’ !
By admin | Published: October 03, 2016 9:19 PM