ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - महाराष्ट्र सरकारने मॅगीवर घातलेल्या बंदीविरोधात नेस्ले कंपनीला मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला नसून मॅगीवरील बंदी तूर्तास कायम राहणार आहे. महाराष्ट्र सरकारने अन्य राज्यांच्या पावलावर पाऊल ठेवत शिशाचे व एमजीएम चे प्रमाण निर्धारीत मात्रेपेक्षा जास्त असल्याचे सांगत मॅगीच्या सर्व उत्पादनांवर बंदी घातली. याविरोधात नेस्ले कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
आम्ही स्वतंत्ररीत्या मॅगीच्या पाच चाचण्या घेतल्या असता, शिशाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याचे महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाने सांगितले. तर, प्रमाणाविषयीच्या निकषा अर्थ कसा लावायचा याबाबतचा निर्णय न्यायालयानेच घ्यावा अशी विनंती नेस्लेने दावा करताना केली. या प्रकरणी दोन्ही पक्ष आपापली बाजू मांडत असून सुनावणी सुरू राहणार आहे. मात्र, या कालावधीत मॅगीवर घातलेल्या बंदीला स्थगिती मिळावी अशी नेस्लेची अपेक्षा होती. उच्च न्यायालयाने बंदीला स्थगिती देण्यास नकार देत मॅगीची उत्पादने महाराष्ट्रात विकता येणार नाहीत यावर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान याप्रकरणी ३० जूनला पुढील सुनावणी होणार आहे.