मुंबई - आज सगळेच जण डिजिटलबद्दल बोलतात. प्रत्येक उद्योगात डिजिटल जोरात आहे. बातम्यांचं जगही त्याला अपवाद नाही. पण वर्तमानपत्रं, अर्थात प्रिंट मीडियाही यापुढच्या काळात तितकाच प्रभावी राहील, असा विश्वास लोकमत मीडियाचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी आज व्यक्त केला. मॅग्नेटिक महाराष्ट्र समिटमध्ये 'मीडियाः शेपिंग द फ्युचर ऑफ इन्फॉर्मेशन अँड एन्टरटेन्मेंट' या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
पाच वर्षांपूर्वी ट्रेनच्या एखाद्या डब्यात १०० जण पेपर वाचताना दिसायचे. आज ही संख्या २० वर आली आहे. वृत्तपत्रांची जागा स्मार्टफोनने घेतलीय, पण वृत्तपत्रांवरचा विश्वास जराही कमी झालेला नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. कमी किंमत आणि सोयीस्करपणे - अगदी घराच्या दारात उपलब्ध होत असल्यानं वृत्तपत्रं जनतेच्या मनात घर करून आहे. त्यामुळे या माध्यमाबाबत लोकमत सकारात्मक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
या चर्चासत्रात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, दिग्दर्शक रितेश सिधवानी, व्हायकॉम 18चे ग्रूप सीईओ सुधांशू वत्स, रिपब्लिक टीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे कन्टेंट हेड विजय सुब्रमण्यम सहभागी झाले होते. हे सगळ्यांचा भर डिजिटल मीडियावर असताना, ऋषी दर्डा यांनी वर्तमानपत्रांची - प्रिंट मीडियाची ताकद वर्णन केली. लोकमतचे ३०० वार्ताहर महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातील बातम्या देण्यासाठी सज्ज आहेत आणि त्या वाचकांनाही हव्यात, असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
प्रिंट मीडियासोबतच इंटरनेट, डिजिटल मीडियाबाबतही लोकमत समूह जागरूक आहे आणि त्यातही चांगली गुंतवणूक करत असल्याचं ऋषी दर्डा म्हणाले. पुढच्या चार ते पाच वर्षांत ग्रामीण भागात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या शहरी इंटरनेट यूजर्सपेक्षा जास्त असेल. हे लक्षात घेऊन डिजिटल कन्टेंट आणि व्हिडिओवरही लक्ष केंद्रीत केल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, चित्रपट (बॉलिवूड), टीव्ही, वेब, वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने राज्यात 'मीडिया हब' तयार करणं गरजेचं असल्याचं मत शाहरुख खाननं या चर्चासत्रात मांडलं. मीडिया हे क्षेत्र वेगाने वाढत असून त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधीही निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याची ताकद मीडियामध्ये असल्याचा विश्वास सर्वच वक्त्यांनी व्यक्त केला.