ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि, १३ - सूर्य, चंद्र आणि गुरू हे ग्रह सिंह राशीत असतानाच श्रावणी अमावास्या, असा दुर्मिळ योग जुळून येत आज त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर साधू-संतांनी दुस-या शाहीस्नानाला पहाटे तीनच्या सुमारास सुरूवात केली आणि साडे दहा पर्यंत मानाच्या दहाही आखाड्यांचे शाही स्नान पूर्ण झाले आहे. सुरुवातीला शंकराचार्य सरस्वती यांनी पहाटे तीनच्या सुमारास शाहीस्नान केले. त्यानंतर निरंजनी आणि आनंद आखाड्याच्या साधू-संतांना शाहीस्नान करण्याचा मान मिळाला. शाहीस्नानाला येण्यापूर्वी या आखाड्यांच्या साधू-संताच्या शाहीमिरवणूकांना सुरुवात झाली होती. निरंजनी आणि आनंद आखाड्याच्या साधू-संतांना शाहीस्नान केल्यानंतर अग्नी, जुना आणि आवाहन या आखाड्याच्या साधू-संतांच्या शाहीस्नान केले. शाहीस्नानाचा हा महापर्वकाळ साधण्यासाठी लाखो भाविक शुक्रवारपासूनच कुंभनगरीत दाखल झाले आहेत.
त्र्यंबकेश्वरमध्ये कुशावर्त तीर्थावर कुंभमेऴा मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह उपस्थित आहेत. पहिल्या शाहीस्नानावेळी प्रशासनाकडून काही प्रमाणात अतिरेक झाला होता. मात्र यावेळी भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची काऴजी घेण्यात आली असून योग्य नियोजन करण्यात आले आहे. या दुस-या शाहीस्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. त्यामुऴे त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार असल्याची शक्यता कुंभमेऴा मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तविली आहे. मानाच्या आखाड्यांचे शाहीस्नान पूर्ण झाल्यानंतर दुपारी बारानंतर भाविकांना शाहीस्नान करता येणार आहे.
पहिल्या पर्वणीला भाविकांची परवड झाल्याने वाहतुकीचे फेरनियोजन करण्यात आले आहे. नाशिकला तपोवनातील साधुग्राममधून सकाळी सहा वाजता आखाडे व खालशांची शाही मिरवणूक निघाली आहे. यामध्ये निर्मोही अनी आखाडा अग्रभागी आहे. मिरवणुकीत दिगंबर आखाड्याचे ४५०, निर्वाणी आखाड्याचे १७५ तर निर्मोहीचे ७२ खालसे आहेत. सकाळी ७ वाजता रामकुंडावर सर्वात आधी निर्माेही अनी आखाड्याचे स्नान होईल. भाविकांना गोदाघाटाकडे जाण्याचा मार्ग सुकर व्हावा, याकरिता बंदोबस्ताचा विळखा सैल करण्यात आला आहे. भाविकांसाठी शहरांतर्गत बससेवा असेल. महापर्वणीला सुमारे ३० ते ३५ लाखांहून अधिक भाविक येण्याचा अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.
अमावास्या समाप्तीश्रावणी पिठोरी अमावास्या रविवारी दुपारी १२.११ वाजता समाप्त होईल. त्यानंतर गोदास्नानासाठी भाविकांची रामघाटावर प्रचंड गर्दी लोटण्याची शक्यता आहे. धरणातून पाणी सोडलेशुक्रवारी रात्रीपासूनच गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण पर्वणीसाठी पाटबंधारे खात्याने १२५ दशलक्ष घनफूट इतके पाणी सोडले आहे. सुनावणीपूर्वी पर्वणी आटोपतीलपर्वण्यांसाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास मज्जाव करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. सोमवारी त्यावर सुनावणी होईल. तत्पूर्वी दुसरी पर्वणी आटोपलेली असेल. सरकारकडून स्पष्टीकरण मागितल्यानंतर अंतिम निवाडा होईल. मात्र तोपर्यंत तिसरी व अंतिम पर्वणी १८ सप्टेंबरला पार पडलेली असेल.