मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay), पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे पंढरपुरात दाखल झाले आहेत. उद्या, मंगळवारी पहाटे २.१५ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा केली जाणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाचा वारकरी देखील ही पूजा करणार आहे. फक्त हे वारकरी दाम्पत्य कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे दर्शन रांगेतून निवडलेले नसणार आहे. (CM Uddhav Thackreay Reached to Pandharpur for Vitthal Mahapooja.)
आषाढी यात्रा दरवर्षी आषाढ शुध्द एकादशी या दिवशी भरते. गेल्या वर्षी देखील कोरोनामुळे मोजक्या लोकांसोबत शासकीय महापूजा करण्यात आली होती. श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहारा देणाऱ्या एकूण ८ विणेकऱ्यांपैकी २ विणेकऱ्यांना मागी वर्षी आषाढी व कार्तिकी एकादशीला संधी मिळाली होती.
यंदा देखील यापैकी ४ विणेकऱ्यांचा सेवेचा कालावधी एक वर्षापेक्षा कमी असल्याने केशव शिवदास कोलते व बापू साळुजी मुळीक या दोन विणेकऱ्यांपैकी पांडूरंग (ईश्वर) चिट्टीने केशव शिवदास कोलते (वय ७१ वर्षे, रा. मु. संत तुकाराम मठ, वार्ड नं. १५, नवनाथ मंदिर पाठीमागे वर्धा, ता.जि. वर्धा) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली आहे.
यामुळे मुख्यमंत्र्यांसोबत केशव शिवदास कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई केशव कोलते हे वारकरी दाम्पत्य विठ्ठलाची महापुजा करणार आहेत. कोलते हे मागील २० वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहेत. स्वतः व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत.