बार्शी : कोल्हापूर, सांगली, सातारा येथे झालेल्या महापुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. अशा घरांच्या नुकसानीचा आढावा घेऊन बेघरांसाठी नव्याने घरांची उभारणी करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सोपवली आहे. महाहौसिंंगच्या माध्यमातून हे आवाहन स्वीकारून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्वास गृहनिर्माण महामंडळाचे सहअध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री राजेंद्र मिरगणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केला.
मिरगणे यांच्याकडे मंत्रिपदाचा दर्जा जाहीर केल्यानंतर प्रथमच बार्शीत आल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला. ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून राज्यात २६ लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करताना गृहनिर्माणाला गती मिळावी या उद्देशाने डिसेंबर २०१८ मध्ये शासनाने महाहौसिंगची स्थापना केली. या महामंडळाचे अध्यक्षपद मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे असून, सहअध्यक्षपद माझ्याकडे सोपवले आहे. आता शहरी भागाच्या धर्तीवर स्मार्ट सिटीचा नियोजनबद्ध आराखडा मांडून वसाहती उभारल्या जात आहेत, त्याप्रमाणेच ग्रामीण भागातही स्मार्ट व्हिलेजची संकल्पना साकारणार आहे.
नुकतेच शासनाने सर्वांना परवडेल अशा किमतीत घरे बांधण्याच्या आधुनिक स्थापत्य तंत्रज्ञान बाबतचा अभ्यास लक्षात घेऊन महापूरग्रस्त भागात विस्थापित झालेल्या बेघरांना घरे बांधून देण्याचीही धुरा सोपविली आहे. त्या भागात जाऊन त्याची प्रत्यक्ष जाऊन पहाणी घराच्या नुकसानीची ग्राऊंड पातळीवर करणार. त्यानंतर घरे उभारण्याची संख्यात्मक आवश्यकता व अंदाजपत्रक याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. लवकरच पोलीस होमगार्ड, अन्य सरकारी कर्मचारी यांच्यासाठी समर्पित वसाहती उभारण्याचे पायलट प्रोजेक्ट राज्यात कार्यान्वित होतील. त्यातील तीनला सोलापुरात मंजुरी मिळाली असून, वर्षअखेरीस १ लाख घरांना मंजुरी मिळणार असल्याचे राजेंद्र मिरगणे यांनी माहिती दिली. यावेळी गृहनिर्माण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते़