लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri violence incident) आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर उसळलेल्या दंग्यात भाजपाचे 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. यामुळे देशातील राजकीय वातारवरण ढवळून निघाले असून यामध्ये केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलाला वाचविण्याचा आणि शेतकरी आंदोलन दड़पण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. (Maha Vikas Aghadi called statewide bandh October 11 against the Lakhimpur Kheri violence incident)
राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबरला लखीमपूर खेरी प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, असे राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. हा बंद पक्षांच्या वतीने असून राज्य सरकारच्या वतीने नाहीय असे देखील पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबत देखील आम्ही बोलणार आहोत असे देखील ते म्हणाले.
महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने आता भाजपा त्याला काय प्रत्यूत्तर देते, यावरून बंद यशस्वी होणार की चिघळणार हे ठरणार आहे.
यूपीतील योगी सरकारने राजकीय नेत्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर योगी सरकारने मृत शेतकऱ्यांच्या वारसांना 45 लाख रुपये आणि एक सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतू या घटनेवरून विविध व्हिडीओ समोर येत आहेत.