रत्नागिरी - उद्धव ठाकरेंना आता तरी बुद्धी यायला हवी. महाविकास आघाडी बनताना शरद पवारांनी आणि मविआ नेत्यांनी हट्ट केला म्हणून मी मुख्यमंत्री झालो असं सांगणारे उद्धव ठाकरे आज मला मुख्यमंत्री करा म्हणून वारंवार विनवणी का करावी लागतेय असा प्रश्न शिवसेना शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी विचारला आहे.
एका मुलाखतीत आमदार योगेश कदम म्हणाले की, उद्धव ठाकरेंना पूर्णपणे संपवण्याचा कट महाविकास आघाडीत रचला जातोय. उद्धव ठाकरे मविआला बळी पडलेत. मविआ या निवडणुकीत एकत्र सामोरे आले तरी शरद पवार आणि काँग्रेस यांचं वेगळ्या पद्धतीचे राजकारण आहे. ते १०० टक्के टिकून राहतील. मात्र २३ नोव्हेंबरला जेव्हा महाराष्ट्राचा निकाल लागेल तेव्हा उद्धव ठाकरे नेस्तनाबूत झालेले असतील असा टोला त्यांनी लगावला.
तसेच उद्धव ठाकरेंच्या आजाराचा फायदा हा सहानुभूती मिळवण्यासाठी घ्यायचा आणि शिवसैनिकांच्या भावनेला हात घालायचा. मागील वेळी अचानकपणे गळ्यात पट्टा आला होता. ठीक आहे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली होती, उद्धव ठाकरेंना निरोगी आणि दिर्घायुष्य लाभो यासाठी आम्ही प्रार्थना करतो. परंतु त्या आजारपणाचा फायदा राजकारणासाठी करून घ्यायचा आणि शिवसैनिकांना सोबत जोडून घ्यायचा प्रयत्न करायचा हा त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे असंही आमदार योगेश कदम यांनी म्हटलं.
दरम्यान, शेवटचा पर्याय म्हणून ते आजारपणाचा फायदा घ्यायला बघतायेत परंतु जनता आता त्यांना भूलणार नाही. मागच्या वेळी त्यांच्या गळ्यात जो पट्टा होता तेव्हाही जनतेने त्यांना प्रतिसाद दिला नाही. आता आजारपणाचा फायदा ते घेऊ पाहतायेत त्यालाही जनता जुमानणार नाही असं आमदार योगेश कदम यांनी सांगितले.
महायुतीत वाद नाही, ठराविक कार्यकर्त्यांचा विरोध
दापोली मतदारसंघात संपूर्ण भाजपा कार्यकर्त्यांचा विरोध नाही तर काही ठराविक कार्यकर्ते ज्यांनी मागील निवडणुकीतही माझ्याविरोधात काम केले होते, ते विरोध करतायेत. आजही जे भाजपा कार्यकर्ते नरेंद्र मोदींना मानतात, देवेंद्र फडणवीसांना आणि मोहन भागवतांना मानतात ते भाजपा कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. रवींद्र चव्हाण हे महायुतीचे नेते आहे. त्यांनाही मी प्रचाराला बोलवणार आहे. चव्हाण प्रचाराला आले तर त्यांचे स्वागत आहे आणि नाही आले तरी आम्ही सक्षम आहोत असं आमदार योगेश कदम यांनी सांगितले.