लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा राहील. मतभेद न करता सोबत राहून लढायचे हे ठरलेले आहे. त्यामुळे सरकार महाविकास आघाडीचेच बनणार, यात काही शंका नाही, असा विश्वास काँग्रेसचेमहाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्रात राहुल गांधी यांच्या चार मोठ्या सभा होतील, अशी माहितीही त्यांनी दिली. सोमवारी सकाळी त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. कार्यालयातील स्वातंत्र्य सेनानी व माजी मंत्री जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्यास त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांचे स्वागत केले.
मतभेद राहणार नाहीत
- लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस मोठा पक्ष म्हणून पुढे आला.
- विधानसभा निवडणुकीत जागावाटपात काँग्रेस किती जागांवर आग्रही राहील, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, याबाबतीत आता बोलणी सुरू होतील. मुंबईत यासाठी बैठक होईल.
- जागावाटपाबाबत फारसे मतभेद राहणार नाहीत.
कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सर्वाधिक आत्महत्या
महायुतीच्या लाडकी बहीण योजनेवर ते म्हणाले, निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अशा योजना जाहीर होत आहेत. एकीकडे अशा घोषणा करायच्या आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना भूमिका घ्यायची नाही. राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत, ही किती गंभीर बाब आहे. काँग्रेसमधून आउटगोइंग थांबले आहे. इनकमिंगचे स्वागत आहे.
लोकांना हे आवडलेले नाही
- संपादकीय विभागाशी संवाद साधताना चेन्नीथला म्हणाले, निवडून आलेले सरकार पाडून महायुतीचे सरकार बनलेले आहे. हे कृत्य लोकांना आवडलेले नाही.
- देशातील लोकांना काँग्रेसबद्दल प्रेम आहे, लोकसभा निवडणुकीत ते दिसले आहे. विधानसभा निवडणुकीसाठीही काँग्रेस एक चांगला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. त्यात पाच गोष्टींची हमी दिली जाणार आहे.
- काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत. - संघटनात्मक कामाचा आपला प्रदीर्घ अनुभव आहे.
- आपल्या जुन्या सहकाऱ्यांना या निवडणुकीत न्याय देण्याची आपली भूमिका राहणार आहे का? या प्रश्नावर चेन्नीथला उद्गारले, हो नक्कीच! या जुन्या सहकाऱ्यांना प्राधान्य देण्याचा माझा मानस आहे.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?
उद्धव ठाकरे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत काय? या प्रश्नावर ते म्हणाले, दिल्लीत ते आले होते. माझी त्यांची भेट झाली. अन्य नेत्यांनाही ते भेटले. परंतु, महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा आहे. लोकसभेतही इंडिया आघाडी हाच देशभर चेहरा होता. काँग्रेस आंदोलने करते; पण, ती प्रभावी नसतात, याकडे लक्ष वेधल्यानंतर चेन्नीथला म्हणाले, आम्ही तोडफोडीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. जनजीवन विस्कळीत होऊ नये, ही आमची भावना आहे.