Maha Vikas Aghadi: राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी INDIA नावाची आघाडी केली असून, याची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, राज्यात भाजपला घेरण्यासाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची एक बैठक होणार असून, यामध्ये भाजपविरोधी लढ्याची ब्लू प्रिंट तयार केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संसद आणि विधिमंडळामध्ये विरोधी पक्षांनी मणिपूरच्या मुद्दय़ावरून भारतीय जनता पार्टीला पुरते घेरले आहे. रस्त्यावरही विविध माध्यमांतून देशभरात भाजपविरोधी लढाई सुरू आहे. या लढाईसाठी स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकाही यशस्वी झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक बोलवण्यात आली आहे. त्यात भाजपविरोधी लढय़ाची ब्लू प्रिंट तयार होणार आहे, असे सांगितले जात आहे.
इंडिया आघाडी दिवसेंदिवस मजबूत
मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्दय़ावरून विरोधी पक्ष भाजपवर तुटून पडला आहे. इंडिया आघाडीतील १६ पक्षांच्या २१ खासदारांनी धगधगत्या मणिपूरमध्ये जाऊन तेथील पीडितांची भेट घेतली. निर्वासित छावण्यांमध्ये व्यथा जाणून घेतल्या. इंडिया आघाडी दिवसेंदिवस मजबूत होऊ लागल्याने भाजपचे धाबे दणाणले आहे. दुसरीकडे, राज्यात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही प्रमुख घटक पक्षांच्या आमदारांसह मित्रपक्षांच्या आमदारांची संयुक्त बैठक होणार आहे.
दरम्यान, या बैठकीला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी, काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधान परिषदेतील ठाकरे गटाचे आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे या प्रमुख नेत्यांसह महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.