मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपासंदर्भात अद्याप महाविकास आघाडीमध्ये एकमत झालेले नाही. याच पार्श्वभूमीवर आज (२ फेब्रुवारी) महाविकास आघाडीची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार? आजची बैठक यशस्वी होणार का? याकडे राजकीय वर्तुळातील लोकांचे लक्ष लागले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज मुंबईत महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सुद्धा उपस्थित आहेत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे. तसेच, सत्ताधाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या लढ्याला मजबूत करण्यासाठी महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
वंचित बहुजन आघाडीला अखेर महाविकास आघाडीत स्थान देण्यात आले आहे. वंचितला आघाडीत सामील करून घेण्याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आधीच सकारात्मक होते, गेल्या मंगळवारच्या बैठकीत काँग्रेसकडूनही याला संमती मिळाल्यानंतर याविषयीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाठविण्यात आले आहे. वंचितने सामील व्हावे यासाठी तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून त्यानुसार महाविकास आघाडीत समावेश करण्यात येत असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुका पुढील काही दिवसांत होणार असल्याने सत्ताधारी एनडीए आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाबद्दल खल सुरू आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधक या निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडी कमजोर झाल्याचे दिसत असले तरी आगामी निवडणुकीच्या रणांगणात संपूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्धार दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटप अंतिम टप्प्यात आले असून लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३४ जागांचा तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र उर्वरित १४ जागा मविआतून कोणते पक्ष लढणार, याबाबत अजूनही रस्सीखेच सुरू आहे.