मुंबई : राज्याचे राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे, शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केलं जात आहे, सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे. फुटीरतेची बीजं इथं पेरली जात आहेत. राज्यपालांना महाराष्ट्राची अस्मिता, महत्व कमी करायचे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत आहे. त्याविरोधात येत्या 17 तारखेला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
सोमवारी आगामी हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्यासाठी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंततर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी महाविकास आघाडीचा महामोर्चा 17 डिसेंबर रोजी मुंबईत काढण्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, "राज्यात अस्तित्वात आलेल्या बेकायदेशीर सरकारमुळे राज्याची अस्मिता धुळीस मिसळत आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडे जात आहेत. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या गावांवर दावा केला आहे. पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने महाराष्ट्रातील गाव तोडणार का? या सगळ्यावरून राज्यात मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडतोय."
याचबरोबर, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान धुळीस मिळत आहे. गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवली. त्यामुळे महाराष्ट्राचा अपमान होत असल्याने आता महाराष्ट्राच्या शक्तीचं विराट दर्शन दाखवले पाहिजे. यासाठी जिजामाता उद्या ते आझाद मैदान असा हा विराट महामोर्चा निघणार आहे. महाराष्ट्राचा अपमान सहन होत नाही त्यांनी येथे एकत्र यावे. महाराष्ट्र द्वेशांना धडा शिकवण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी सर्वांना केले आहे.