Maharashtra Politics: राज्यातील पदवीधर निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यातच राज्यतील जनतेचे लक्ष नाशिक पदवीधर निवडणुकांकडे लागले आहे. पक्षाचा आदेश झुगारून सुधीर तांबे यांनी मुलासाठी माघार घेतली. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यामुळे अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. तर, सत्यजित तांबे यांना भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. यातच निवडणूक लढायला नाही तर जिंकायला आलो आहे, असा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीवरून खासदार विनायक राऊत आणि सुभाष देसाई यांनी जोरदार निशाणा साधला. सुभाष देसाई यांनी बोलताना शुभांगी पाटील यांच्या जागेविषयी विश्वास व्यक्त करत त्यांनी सांगितले की, मी इथे निवडणूक लढायला नाही तर निवडणूक जिंकायला आलो आहे. सुभाष देसाई यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवतच सत्याजित तांबे यांच्यावर टीका केली. ज्याने आपल्या पक्षाशी गद्दारी केली आहे त्यांना जनता माफ करत नाही, असा खोचक टोला त्यांना लगावला आहे. आमदार ऋतुजा लटके यांनी बाजी मारलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीची आठवण सांगत सुभाष देसाई यांनी, भाजपने कसा त्रास दिला त्याची आठवणही त्यांनी यावेळी करून दिली.
शुभांगी पाटील यांना निवडून येण्यासाठी आपण कुठलीही कसर ठेवायची नाही
शुभांगी पाटील यांना निवडून येण्यासाठी आपण कुठलीही कसर ठेवायची नाही. शुभांगी पाटील यांना मातोश्रीचा पाठिंबा असल्यामुळेच त्यांना महाविकास आघाडीचादेखील पाठिंबा मिळाला आहे, असे सुभाष देसाई यांनी सांगितले. ज्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, आणि शिवसेना एकत्र येते, त्यावेळी समोरच्याचा पालापाचोळा होतो, असा टोला यावेळी लगावला. शुभांगी पाटील यांना आपण निवडून आणायचे आहे आणि त्यांना आपण विधान परिषदेवर सभापती निवडून आणायचे आहे. त्यामुळे एक एक जागा महत्त्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंना काँग्रेसचा पाठिंबा नाहीच, हे आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडून शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. तर, सत्यजित तांबेंवर काँग्रेसने निलंबनाची कारवाई केली आहे. ६ वर्षांसाठी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"