कराड/ कोल्हापूर : कराडमध्ये महाआघाडीची सभा सुरु झाली असून व्यासपीठावर नेत्यांची संख्या वाढल्याने कार्यकर्त्यांनी आणलेला मोठा हार तुटला आहे. यामुळे पहिल्याच सभेला अपशकून झाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरु झाली.
कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मतदारसंघात महाआघाडीने प्रचाराचा नारळ फोडला आहे. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, खासदार उदयनराजे, अमोल कोल्हे यांच्यासह नेत्यांची संख्या जास्त झाल्याने आणलेला मोठा हार घालताना ताणल्याने तुटला. यामुळे हा पडलेला हार उचलून पुन्हा जोडण्यात आला.
कोल्हापुरातून महायुती आणि महाआघाडीच्या प्रचाराचा एकाचवेळी नारळ फुटला आहे. कराडमध्ये महाआघीडीची सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह खासदार उदयनराजे उपस्थित होते. तर कोल्हापुरातील महायुतीच्या सभेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील आदी उपस्थित आहेत. दोन्ही सभांना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी लोटली आहे.
भाषणावेळी राजू शेट्टी यांनी भाजपाने अच्छे दिन नाही तर लुच्चे दिन दिल्याचा आरोप केला. तसेच शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने कुटुंबासह बँकांचे उंबरठे झिजविले तरीही कर्जमाफी मिळाली नसल्याचा आरोप केला.
साताऱ्याचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भाषणाला उभे राहताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ही लोकशाही आहे. निवडणुका सुरुच असतात. निवडणुकीत कोणाला, का आणि कशासाठी करायचे याचा विचार केला पाहिजे, असे उदयनराजे यांनी सांगितले. जेव्हा लोक एका विचाराने एकत्र येतात, तेव्हा त्यांचे उद्दीष्ट्य एक असते. पण ज्यावेळी स्वार्थासाठी एकत्र येतात तेव्हा ते स्वार्थाचाच विचार करतात. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत लोकांची दिशाभूल केली गेली. हायटेक प्रचार केला गेला. यामुळे वाट्टेल ती आश्वासने लोकांना दिली. जनता त्याला बळी पडली. तळागाळातल्या लोकांबाबत तळमळीने बोलले पण आजची अवस्था पाहिली तर त्याच लोकांचा विसर पडला. या काळात अन्यायकारक धोरणे आणि निर्णय घेण्यात आले, असा आरोप उदयन राजेंनी केला.