मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे ग्रामीण मतदारसंघातून आपल्या उमेदवारी प्रचाराचा शुभारंभ केला आहे. धुळ्यातील सभेत बोलताना फडणवीस यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना लक्ष्य केलं. तसेच, काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावरुनही काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादी आता थकलेत. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असं वक्तव्य करुन सुशीलकुमार यांनी राष्ट्रवादी-काँग्रेसचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याचे संकेत सोलापुरातील सभेत दिले आहेत.
सुशिलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावरुन आणि महाआघाडीच्या जाहीरनाम्यावरुन मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांवर निशाणा साधला. तसेच, राहुल गांधींनाही महाराष्ट्रातील पराभव मान्य असल्याचे फडणवीस यांनी म्हटलंय. ''काँग्रेसचे नेते राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेलेत, महाराष्ट्रातील पराभव त्यांनाही माहितीय. पवारांचा पक्ष अर्धा रिकामा झालाय, उरलेला पक्ष निवडणुकीनंतर रिकामा होईल. आता, आमचं वय झालंय, निवडणूक झाली की काँग्रेस-राष्ट्रवादीचं विलनीकरण करून टाकू, असं सुशिलकुमार शिंदेंनी म्हटलं. भाजपा-सेनेचा सामना करण्यासाठी अशी अवस्था या पक्षांची झालीय. निवडणूक हरल्याचं यांनी मान्यच केलंय. महाआघाडीने दोन दिवसांपूर्वी जाहीरनामा घोषित केला. त्यांचा जाहीरनामा म्हणजे जगातले सगळेच आश्वासन दिलेत. या जाहीरनाम्यात एकच आश्वासन द्यायचं राहिलंय. ते म्हणजे, 'महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एक-एक ताजमहाल बांधून देऊ,' एवढंच आश्वासन द्यायचं राहिलंय, असे म्हणत फडणवीस यांनी महाआघाडीच्या जाहीरनाम्यावर टीका केली.
दरम्यान, सोलापूरमधील सभेत बोलताना शिंदे म्हणाले होते की, कधीतरी एका झाडाखाली आम्ही वाढलेले आहोत, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलं आहे. प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही त्यामुळे भविष्यात दोन्ही पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर दिसतील असा विश्वास सुशीलकुमार यांनी व्यक्त केला आहे.