अकोला - शेतकर्यांच्या नुकसानभरपाईची सुमारे ७ लाख रुपयांची रक्कम महाबीज कर्मचारी पतसंस्थेच्या चालू खात्यात जमा करणारे महाबीज कर्मचारी पतसंस्थेचे व्यवस्थापक किसनराव सदाशिवराव भांबेरे (५८) यांनी शनिवारी मध्यरात्री रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. राज्यातील २८६ शेतकर्यांपैकी १८ शेतकर्यांची नुकसानभरपाईची सात लाख रुपयांची रक्कम महाबीज कर्मचारी पतसंस्थेचे सचिव दिलीप नानासाहेब देशमुख यांनी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाद्वारे पतसंस्थेच्याच चालू खात्यात जमा केली होती. शेतकर्यांच्या नुकसानभरपाईची रक्कम त्यांना न देता त्यामध्ये हेराफेरी करीत ही रक्कम परस्पर दुसर्या खात्यात जमा केल्याने या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर शनिवारी मध्यरात्री जुने शहरातील लक्ष्मीनगर येथील रहिवासी तथा महाबीज कर्मचारी पतसंस्थेचे व्यवस्थापक किसनराव सदाशिवराव भांबेरे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. याच प्रकरणामध्ये महाबीजच्या अधिकार्यांनी भांबेरे यांचे २ सप्टेंबर रोजी बयाण नोंदविले होते. व्यवस्थापक भांबेरे यांच्या आत्महत्येमुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. धड आढळले रात्री, तर शिर सकाळी महाबीज कर्मचारी पतसंस्थेचे व्यवस्थापक किसनराव भांबेरे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्यानंतर डाबकी रोड पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा शोध सुरू केल्यानंतर भांबेरे यांचे धड त्यांना रात्री ३ वाजताच्या सुमारास आढळले. मात्र, शिराचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी भांबेरे यांचे शिर शोधण्यासाठी रात्रीपासून मोहीम हाती घेतली. सकाळी ७ वाजेनंतर त्यांचे शिर आढळले व त्यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
दोन सुसाईड नोट आढळल्या
किसनराव सदाशिवराव भांबेरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दोन सुसाईड नोट लिहिल्या होत्या. यामध्ये एका नोटमध्ये घराचा पत्ता लिहिण्यात आला होता, तर दुसर्या नोटमध्ये आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यांचे २ सप्टेंबर रोजी महाबीजच्या अधिकार्यांनी बयाण नोंदविले असून, यावेळी ते तणावात असल्याची माहिती आहे. या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा महाबीजच्या अधिकारी, कर्मचार्यांमध्ये सुरू आहे.