- रूपेश खैरी, वर्धा
खरीप हंगामात शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाणे पुरविण्यात शासकीय कंपन्यांनी असमर्थता दर्शविली आहे. महाबीज वर्धा जिल्ह्यासाठी केवळ ८ हजार ७४६ क्विंटल बियाणे देणार आहे, तर दुसरी शासकीय कंपनी सीड्स कार्पोरेशनने आतापर्यंत केवळ २ हजार क्विंटल बियाणे पुरविले आहे. यामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खासगी कंपनीचे महागडे बियाणे खरेदी करावे लागत आहे. यंदा जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी १.२२ लाख हेक्टरवर होणार आहे. शेतकऱ्यांना ५७ हजार ७५० क्विंटल बियाण्यांची गरज आहे. त्यामुळे कृषी विभागाने महाबीजकडून २५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण करण्यास महाबीजने असमर्थता दर्शविली असून केवळ ८ हजार ७४६ क्विंटल बियाणे पुरविण्याची हमी दिली आहे. यातील ३ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात येणार आहे. तर ७२० क्विंटल बियाणे कृषी विभागाच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमाकरिता देण्यात येणार आहे. उर्वरित २ हजार ३६५ क्विंटल बियाणे बाजारात विक्रीकरिता उपलब्ध करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे सव्वा एकर जमीन आहे त्यांना अनुदानित बियाण्यांचा लाभ मिळाला आहे.
- शेतकऱ्यांकडून अनुदानित बियाण्यांची मागणी वाढत असल्याने, कृषी विभागाने तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्याची गरज असल्याचे, येथील महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एन.बी. खांडेकर यांनी सांगितले.
बाजारात खासगी कंपन्यांची बियाणे असल्याने शेतकऱ्यांना बियाण्यांकरिता भटकंती करण्याची गरज नाही. - ज्ञानेश्वर भारती, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा