पुणे : विद्यार्थ्यांचा विरोध आणि आक्रमक आंदोलनाच्या महाभारताचा दुसरा अध्याय आज एफटीआयआयमध्ये पाहायला मिळाला. निदर्शने आणि विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. गुरुवारी सकाळपासूनच एफटीआयआयला छावणीचे स्वरूप आले होते. सकाळीच मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमार केला. तर २३ विद्यार्थ्यांना ताब्यातही घेण्यात आले. विद्यार्थ्यांची ही निदर्शने आणि आंदोलन सुमारे तासभर चालले. अखेर पोलिसांनी प्रमुख आंदोलकांना ताब्यात घेऊन गजेंद्र चौहान यांच्यासाठी ‘ग्राऊंड क्लीअर’ करून दिले. त्यानंतर आलेल्या चौहान यांनी गेल्या चार-पाच महिन्यांपासून चित्रपट क्षेत्रासह सर्वच स्तरांतून होणारा विरोध डावलून नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी बिजेंद्र पाल सिंग यांची सोसायटीच्या उपाध्यक्षपदासह विद्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तसेच सोसायटीने राजकुमार हिरानी, बिजेंद्र पाल सिंग, सतीश शाह, प्रांजल सायकिया, नरेंद्र पाठक व भावना सोमय्या यांचे नियामक मंडळासाठी नामांकन केले. तत्पूर्वी, भारतीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेत पहिल्यांदाच आलेल्या चौहान यांनी कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या निवृत्ती वेतनाच्या प्रश्नासह संस्थेच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. चौहान यांच्यासह इतर सदस्यांच्या नियुक्तीला विरोधासाठी विद्यार्थ्यांनी तब्बल १३९ दिवस आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. मात्र मंत्रालयाच्या चर्चेच्या गु-हाळात भरडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांना अखेर तीन महिन्यापूर्वी संप मागे घेण्याची नामुष्की ओढवली होती. तरीही चौहान यांना संस्थेत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती. दरम्यान तब्बल दोन वर्षानंतर एफटीआयआयमध्ये होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीसाठी चौहान संस्थेमध्ये येणार असल्याचे कळल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांकडून एक दिवस आधीच कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस विद्यार्थ्यांना बजावण्यात आली होती. याकरिता परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र विद्यार्थ्यांनी नोटीशीला केराची टोपली दाखवित चौहान यांच्या संस्थेतील आगमनापूर्वीच सकाळी १० वाजता संस्थेबाहेर निषेधाच्या काळ्या फिती लावून घोषणाबाजी सुरू केली. विद्यार्थी आक्रमक होत असल्याचे पाहिल्यानंतर अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. चौहान यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न होऊ नये यासाठी ते विद्यार्थ्यांना व्हॅनमध्ये जाऊन बसण्याची सूचना करीत होते. पण विद्यार्थी रस्त्यावर ठाण मांडून बसले. विद्यार्थी जुमानत नसल्याने त्यांना धक्काबुक्की आणि सौम्य लाठीमार पोलिसांना करावा लागला. यावेळी पोलिसांनी २३ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. पुणे : विद्यार्थ्यांचा रोष कमी करण्यासाठी गजेंद्र चौहान यांना एफटीआयआयच्या विद्या परिषदेपासून (अकॅडेमिक कौन्सिल) दूर ठेवण्यात आले आहे. एफटीआयआयच्या इतिहासात नियामक मंडळाचा अध्यक्ष आणि विद्या परिषदेचा अध्यक्ष वेगळा असल्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान तर विद्या परिषदेच्या अध्यक्षपदी बिजेंद्र पाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एफटीआयआय सोसायटीच्या नियमाप्रमाणे जो नियामक मंडळाच्या अध्यक्ष असतो तोच विद्या परिषदेचा देखील अध्यक्ष असतो. मात्र गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला असलेला विद्याथर््यांचा विरोध पहाता त्यांना विद्या परिषदेपासून दूर ठेवण्यात आले आहे. एफटीआयआय सोसायटी आणि नियामक मंडळाच्या गुरूवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे चौहान यांच्या अधिकारांवर काहीप्रमाणात कात्री लावण्यात आली असल्याची चर्चा रंंगली असली तरी विद्या परिषद जो निर्णय घेईल त्यावर अंतिमत: नियामक मंडळच शिक्कमोर्तब करणार आहे. त्यामुळे चौहान यांच्या अधिकारांवर तशी कुठल्याप्रकारे गदा आणण्यात आलेली नाही. तरी अभ्यासक्रमामध्ये चौहान यांचा हस्तक्षेप असता कामा नये ही विद्यार्थ्यांची मागणी शासनस्तरावर पूर्ण करण्यात आली आहे. चौहान शुटींगमध्ये व्यस्त असतात, विद्या परिषदेच्या बैठका वर्षातून चार वेळा तरी होणे आवश्यक आहे. याचा विचार करूनच विद्या परिषदेच्या अध्यक्षपदी बिजेंद्र पाल सिंग यांची निवड करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एफटीआयआयचे महाभारत
By admin | Published: January 08, 2016 1:35 AM