राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज)जुन्या बियाण्यांना अनुदान देण्यास शासनाने नकार दिला आहे. यासंदर्भात गुरुवारी मंत्रालयात घेण्यात आलेली उच्चस्तरीय बैठक निष्फळ ठरली. यामुळे शेतकऱ्यांना आता जादा दर देऊनच हे बियाणे बाजारातून खरेदी करावे लागणार आहेत.बियाण्यांचा पुरवठा करताना शेतकऱ्यांना अनुदान स्वरू पात महाबीजचे प्रमुख पिकांचे बियाणे बाजारात उपलब्ध केले जाते. यामध्ये १५ वर्षांवरील (निर्मितीपासून आजपर्यंत) सोयाबीन ३३५, उडीद टीएयू-१, तूर मारोती, आशा बीएसएमआर-५३६, मूग-कोपरगाव, धान-एमटीयू १०-१० या बियाण्यांचा सामवेश असून, या बियाण्यांची शेतकऱ्यांमधून मोठी मागणी आहे, असे असताना या बियाण्यांना अनुदान न देता शासनाने १५ वर्षांआतील बियाण्यांना अनुदान मंजूर केले आहे. हे बियाणे शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर उपलब्ध करण्यात यावे, यासाठीचा प्रस्ताव महाबीजमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला होता. यासंदर्भात २५ मे रोजी उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीला शासनाचे प्रधान सचिव, कृषी सचिव, कृषी आयुक्त तसेच महाबीजचे अधिकारी उपस्थित होते. महाबीजने पाठविलेल्या प्रस्तावासंदर्भात शासनाने केंद्र शासनाकडे अनुदानाची मागणी केली होती; पण केंद्र शासनाने या बियाण्यांना अनुदानची अनुमती दिली नसल्याची चर्चा या बैठकीत झाली. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना १५ वर्षांवरील बियाण्यांना अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ६ लाख ५३ हजार क्ंिवटल विविध बियाण्यांचे नियोजन केले आहे. यातील ७० टक्के बियाणे बाजारात उपलब्ध केली आहेत. यामध्ये गळीत, तृण व कडधान्य बियाण्यांचा समावेश आहे. ही सर्व बियाणे हे १५ वर्षांआतील आहेत. या बियाण्यांना अनुदान देण्यासाठीची अनुमती शासनाने दिली आहे. १५ वर्षांवरील सोयाबीन ३३५, उडीद टीएयू-१, तूर मारोती, आशा बीएसएमआर-५३६, मूग-कोपरगाव, धान-एमटीयू १०-१० या बियाण्यांची उगवण क्षमता उत्तम असून, उत्पादकता भरपूर आहे. शासनाने अनुदान दिले असते, तर सोयाबीन बियाण्यांवर प्रतिकिलो पाच रुपये तर तूर, उडीद या पिकांना प्रतिकिलो १० रुपये एवढे अनुदान मिळाले असते.महाबीजने यावर्षी सर्वच बियाण्यांचे दर हे २० टक्क्यांनी कमी केले आहेत. सोयाबीनचे बियाणे मागच्या वर्षी ६८ रुपये किलो होते. यावर्षी हे बियाणे ५७ रुपये किलोप्रमाणे उपलब्ध आहे. त्यामुळे १५ वर्षांवरील बियाण्यांचे दर माफक आहेत.-रामचंद्र नाके, महाव्यवस्थापक, (विपणन) महाबीज, अकोला.
महाबीजच्या जुन्या बियाण्यास अनुदान नाकारले!
By admin | Published: May 26, 2017 3:19 AM