मुंबई : महाड येथील सावित्री नदीवरील पुल तुटून दोन एसटी बस वाहून गेल्याच्या घटनेत मृत्यू झालेल्या प्रवाशांत आता आणखी एका प्रवाशाची वाढ झाली आहे. मृतांचा आकडा ३0पर्यंत गेला आहे. त्यामुळे अपघातग्रस्त एसटीतील ट्रायमॅक्स मशीनमध्ये नोंद न झालेल्या प्रवाशांची संख्या आठ झाली आहे. महाड येथील दुर्घटनेत मुंबईला येणाऱ्या दोन बसेस सावित्री नदीत वाहून गेल्या होत्या. या घटनेत एसटीचे दोन चालक, दोन वाहक यांच्यासह १८ प्रवासी असे एकूण २२ प्रवासी वाहून गेल्याची नोंद झाली होती. मात्र शोधमोहीम आणि तपासादरम्यान जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या माहितीत एसटीचे आणखी सात प्रवासी असल्याचे समोर आले. त्यामुळे अपघातग्रस्त एसटीतून कर्मचारी व प्रवासी मिळून २९ प्रवासी असल्याचे निदर्शनास आले. त्यातही चार जणांचे मृतदेह मिळाले; मात्र तीन जणांचे मृतदेह मिळालेले नाहीत. सात प्रवासी वाढलेले असतानाच आता आणखी एक प्रवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही एसटी बसमधून वाहून गेलेल्या प्रवाशांची संख्याही २६ एवढी झाली आहे. दोन्ही अपघातग्रस्त बसमधील वाहकांकडे असलेल्या ट्रायमॅक्स मशीनला अपघातापूर्वी दोन तास ‘रेंज’ नव्हती. त्यामुळे एसटीच्या मुख्यालय आणि त्या आगारांत असलेल्या सर्व्हरमध्ये ‘त्या’ दोन तासांत किती प्रवाशांनी प्रवास केला याची नोंद झालेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाकडून या सर्व बाबींचा तपास केला जात असल्याचे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेसंदर्भात घेण्यात येणाऱ्या शोधमोहिमेत एसटीचे १00 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हाती लागलेल्या प्रवाशांचे पार्थिव त्यांच्या नातेवाइकांच्या घरी पाठविण्याची व्यवस्था करतानाच सापडलेल्या एसटीच्या तुकड्यांची तपासणी केली जात आहे. (प्रतिनिधी)
महाड दुर्घटना : आणखी एका प्रवाशाचा मृतदेह सापडला
By admin | Published: August 10, 2016 4:31 AM