मुंबई : महादेव बेटिंग ॲप प्रकरणात गुन्हे शाखेच्या एसआयटीने आणखी एका आरोपीला बेड्या ठोकल्या असून, याप्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता तीन झाली आहे. या प्रकरणातील टेक्निकल मास्टरमाईंड असलेल्या भरत चौधरी असे या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
एसआयटीने यापूर्वी बॉलिवूड अभिनेता साहिल खान आणि दीक्षित कोठारीला अटक केली आहे. या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार चंद्राकर आणि उप्पल हे दुबईमधून या ॲपचा कारभार चालवत असून, त्यांचा साथीदार चौधरी हासुद्धा चार ते पाच वर्षांपासून दुबईत वास्तव्यास होता, अशी माहिती समोर आली होती. यातील चौधरी २३ जुलैला गुजरातच्या पाटण जिल्ह्यात येताच कच्छ पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता मुंबई गुन्हे शाखेने चौधरी याला चौकशीसाठी ताब्यात घेत अटक केली आहे.
चौधरी हा महादेव ॲप आणि इतर ऑनलाईन प्लॅटफाॅर्मशी संबंधित तांत्रिक समस्या सोडवण्यात आरोपींना मदत करत होता. याप्रकरणी गुन्हे शाखेने त्याच्याविरुद्ध लूक आउट सर्क्युलर (एलओसी) देखील जारी केले होते. सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून महादेव ऑनलाईन गेमिंग-बेटिंग ॲपचा प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल याच्यासह ३० हून अधिक जणांविरोधात १५ हजार कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा माटुंगा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला. त्यानंतर एसआयटीकडून तपास सुरू आहे.