मुंबई - दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा जयंती सोहळा परळीमध्ये आज थाटात पार पडला. दरवेळी पंकजा मुंडे यांच्या हिटलिस्टवर असणारा राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबीय यावेळी दिसलं नाही. याउलट पंकजा यांचा रोख संपूर्णपणे भाजपच्या राज्यातील पक्षनेतृत्वाकडे होता. मात्र पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय आणि मानलेले बंधू महादेव जानकर यांनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळवत पवारांना टोला लगावलाच.
तहयात गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी आणि शरद पवारांना विरोध केला. आपला मुख्य शत्रुपक्ष राष्ट्रवादीच असल्याप्रमाणे मुंडे यांनी संघर्ष केला. त्यातच पुतण्या फोडल्यामुळे गोपीनाथ मुंडे व्यथित झाले होते. त्यामुळे हा राग अजुनच वाढला होता. वडिलांचा वसा पुढे चालवणाऱ्या पंकजा मुंडे यांनी देखील वेळोवेळी राष्ट्रवादीला टार्गेट केले. राष्ट्रवादीचे दोन उमेदवार फोडण्याची किमया पंकजा यांनी केली होती.
दरम्यान गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंकजा यांनी राष्ट्रवादी किंवा सत्ताधारी पक्षाविरुद्ध चकार शब्द काढला नाही. किंबहुना आपला पुढील संघर्ष विरोधकांविरुद्ध नसून पक्षांतर्गत असल्याचे त्यांनी ओळखलं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावेळी धनगर नेते जानकर यांनी आपण पंकजा यांच्या पाठिंशी असल्याची ग्वाही दिली. तसेच आपण बारामतीची पालखी वाहणार नसल्याचे सांगत त्यांनी पवारांना टोला लागवला. याआधी देखील जानकर यांनी अशाच प्रकारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली होती.