Mahadev Jankar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्यास अवघे काही तास बाकी असल्याने जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडीला ताकद देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून नवे मित्रपक्ष सोडण्याचाही प्रयत्न होत आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे मागील काही दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात आहे. अशातच जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज महादेव जानकर यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र स्वत: महादेव जानकर यांनी हे वृत्त फेटाळत आज मी शरद पवार यांची भेट घेतली नसल्याचं म्हटलं आहे.
शरद पवारांच्या भेटीबाबतच्या चर्चांवर बोलताना महादेव जानकर म्हणाले की, "माझी आज शरद पवारांसोबत भेट झालेली नाही. तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. मी तिथं एका संपादकांना भेटण्यासाठी गेलो होतो. शरद पवार साहेबांनी मला माढ्याची जागा देऊ केली आहे. मात्र मी माढा आणि परभणी या दोन जागांसाठी आग्रही आहे. परभणीच्या जागेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. रासपला ही जागाही हवी आहे. महाविकास आघाडीने अद्याप आम्हाला चर्चेला किंवा बैठकीला बोलावलेलं नाही," अशी माहिती जानकर यांनी दिली आहे.
कसं आहे माढा मतदारसंघाचं गणित?
माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील फलटण, माण हे दोन तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस आणि सांगोला हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर २००९ मध्ये पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी विजय मिळवला होता. त्यांनी सुमारे ३ लाखांचे मताधिक्य घेतले होते. त्यानंतर २०१४ मध्ये राष्ट्रवादी पक्षाचाच उमेदवार विजयी झाला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील हे खासदार झाले. पण त्यांना केवळ काठावरचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी महायुतीतील सदाभाऊ खोत यांनी निकराची झुंज दिली होती.
दरम्यान, २०१९च्या निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा सुमारे ८५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. महायुतीमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या अजित पवार गटाकडून माढा मतदारसंघाची जागा मिळावी, अशी मागणी होत होती. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी बंधू संजीवराजे नाईक- निंबाळकर यांच्यासाठी ही जागा मागितली होती. मात्र भाजपकडून नुकतीच पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.