Lok Sabha Election ( Marathi News ) : देशात यंदा लोकसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडत असून यातील पाच टप्प्यांतील मतदान पूर्ण झालं आहे. महाराष्ट्रातील सर्व ४८ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता कोणत्या मतदारसंघात कुणाचा विजय होणार, यावर मतदारसंघातील उत्साही कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागत आहेत. तसंच सर्वच राजकीय पक्षांचे नेते या निवडणुकीच्या निकालाबाबत आपला अंदाज व्यक्त करत आहेत. महायुतीच्या बहुतांश नेत्यांकडून ४५ प्लसचा दावाही केला जात आहे. अशातच एनडीएतील घटकपक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रात यावेळी लोकसभा निवडणुकीत 'काँटे की टक्कर' झाल्याचं रामदास आठवले यांनी मान्य केलं आहे. तसंच महायुतीला राज्यात ३५ ते ४० जागा मिळतील, असा दावाही आठवले यांनी केला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांकडून वारंवार ४५ पारचा नारा दिला जात असताना आठवले यांनी मात्र राज्यात चुरशीची लढत झाल्याचं मान्य केल्याने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत
जानकरांनी काय म्हटलं होतं?
"राज्यात फिरताना मला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत लोकांमध्ये काही प्रमाणात सहानुभूती असल्याचं जाणवलं," असं नुकतंच एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना रासपचे अध्यक्ष आणि परभणी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. मात्र असं असलं तरी पवार-ठाकरेंकडे ग्राऊंडवर केडर नसल्याने या सहानुभूतीचं मतात रुपांतर होणार नाही आणि राज्यात महायुती ४२ जागा जिंकेल, असा अंदाज जानकर यांनी वर्तवला.
"महाराष्ट्रात बीड आणि परभणी या दोन लोकसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात जातीवाद झाला. तिकडे पंकजा मुंडे आणि इकडे मी असे दोन्ही ओबीसी उमेदवार असल्याने महाविकास आघाडीने जातीवादाचे षडयंत्र केले. एक व्यक्ती या दोनच मतदारसंघांमध्ये फिरला. मात्र असं असलं तरी परभणीत मी ३० ते ४० हजार मतांनी विजयी होईल आणि बीडमध्येही पंकजा मुंडे यांचाच विजय होईल," असंही महादेव जानकर यांनी म्हटलं होतं.