“BJP एवढा मोठा पक्ष होता, मग अजितदादांना फोडायची गरज नव्हती”; जानकरांचा फडणवीसांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 08:07 PM2023-07-22T20:07:05+5:302023-07-22T20:08:40+5:30
Maharashtra Politics: आताचे नेते हे गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा हुशार आहेत. त्यांना आमची गरज नाही, अशी टीका महादेव जानकर यांनी केली.
Maharashtra Politics: गेल्या काही राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करत सत्तेत सामील झाले. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याचा पदभार देण्यात आला. यातच आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजप जर एवढा मोठा पक्ष होता, तर मग अजित पवार यांना फोडायची गरज नव्हती, असे म्हटत महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
राष्ट्रीय समाज पक्षाने सध्या राज्यभर यात्रा सुरू केली असून, ही यात्रा काही कुणाला विरोध करण्यासाठी नसून जनतेच्या हितासाठी काढली आहे. शेतकऱ्यांच्या, युवकांच्या सर्वसमान्यांच्या प्रश्नासाठी आम्ही राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात ही यात्रा काढली, अशी माहिती महादेव जानकर यांनी दिली. तसेच राष्ट्रीय समाज पक्ष देशात आगामी लोकसभेच्या निवडणुका सबळावर लढणार आहे. लोकसभेच्या ५४३ जागा लढवणार असून चार राज्यांमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळत आहे. काही राज्यांमध्ये विजयही मिळेल. आपण स्वतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.
भाजप एवढा मोठा पक्ष, मग अजितदादांना फोडायची गरज नव्हती
देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, एकनाथ शिंदे आल्यावर फायदा होईल. आता म्हणाले अजित पवार आल्यावर फायदा होईल. तर परत दोन महिन्यांनी म्हणतील आपला साराच बेस निघून गेला. तसेही भाजप एवढा मोठा पक्ष होता तर अजित पवारांना फोडण्याची गरज नव्हती, असा टोला महादेव जानकर यांनी देवेंद्र फडणवीसांना उद्देशून लगावला. तसेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मी भाजप युतीबरोबर गेलो होतो, गोपीनाथ मुंडे लोकनेते होते. आताचे नेते हे गोपीनाथ मुंडे यांच्यापेक्षा हुशार आहेत. त्यांना आमची गरज नाही, आम्ही त्यांच्या मागे लागणे यात काही अर्थ नाही, असे जानकर म्हणाले.
दरम्यान, पंकजा मुंडे सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांना जर भाजपमध्ये जास्तच त्रास झाला तर आम्ही बहीण म्हणून साडी चोळी घेऊन त्यांना आणायला जाऊ. राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर बहीण म्हणून त्यांना काय करायचे ते करू. आता मी फक्त त्यांना एवढंच म्हणेन की, दिल्या घरी सुखी रहा, असे महादेव जानकर यांनी सांगितले.