- सोपान पांढरीपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीने (महाजनको) कोराडीतील निकामी झालेले ४६५ मे.वॅ. क्षमतेचे चार संच केवळ ६०.६० कोटी रुपयांत नागपूरच्याच सनविजय रिरोलिंग इंजिनिअरिंग वर्क्सला विकल्यामुळे ऊर्जा क्षेत्रात खळबळ आहे. या संचाची आजची किंमत २५० कोटी रुपये मिळायला हवी होती, असे ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.प्रकरण काय आहेमहाजनकोने २००७ साली ऊर्जा प्रकल्प नूतनीकरण कार्यक्रमात कोराडीचे संच क्र. १ ते ४ (१२० मे.वॅ. चे ३ व १०५ मे.वॅ.चा एक) निवडले. हे संच ३५ ते ४० वर्षे जुने होते. ते २०१० साली बंद करण्यात आले व त्यांच्याऐवजी ६६० मे.वॅ.चे तीन संच उभारण्यात आले. जुने/निकामी झालेले हे संच विकण्यासाठी महाजनकोने मिनरल्स अॅण्ड स्टील ट्रेडिंग कॉर्पोरेशनमार्फत (एमएसटीसी) आॅनलाईन लिलाव ५ नोव्हेंबर २०१६ ला सुरू केला.लिलावाची जाचक अटलोकमतजवळ असलेल्या कागदपत्रांनुसार या लिलावात भाग घेणाऱ्या कंपनीजवळ १०० कोटींची मालमत्ता व गेल्या तीन वर्षांत सरासरी १०० कोटींची उलाढाल, अशी एक जाचक अट टाकली होती.लिलावाच्या पहिल्या फेरीत सनविजय रिरोलिंग, नागपूर व सिक्कीम फेरो अलॉईज, मुंबई अशा दोनच कंपन्यांची बोली आली. त्यात मालमत्ता व उलाढाल १०० कोटींपेक्षा कमी असल्याने सिक्कीम फेरो अलॉईज बाद झाली. दुसऱ्या फेरीत पुन्हा सनविजय रिरोलिंग व अॅडव्हान्स कॉम्प्युटर्स, मुंबई अशा दोनच निविदा आल्या. नियम डावललेसर्वसाधारणपणे अशा लिलावासाठी तीन कंपन्यांची बोली आवश्यक असताना एकच कंपनी रिंगणात उरली होती. तिचीच बोली स्वीकारण्यात आली. दुसरे म्हणजे, एमएसटीसीच्या वेबसाईटवर अशा लिलावासाठी चार ते सहा फेऱ्या होताना दिसतात. पण महाजनकोने दुसऱ्याच फेरीत लिलाव पूर्ण केला हे संशयास्पद आहे.मातीमोल किंमतयाबाबत लोकमतने कोराडीच्याच एका निवृत्त मुख्य अभियंत्याशी संपर्क साधला. या अधिकाऱ्यानुसार या चारही संचांची अंदाजे किंमत २५० कोटी असावी. कारण त्यातून निघणाऱ्या तांब्याच्या तारांचीच किंमत ६० ते ७० कोटी असेल. इतर धातू अॅल्युमिनीयम, लोखंड, जस्त व इतर सामुग्रीचे अंदाजे २०० कोटी येतील. आज ४६५ मे.वॅ. वीज क्षमता नव्याने निर्माण करायला ३००० कोटींपेक्षा अधिक खर्च येईल. त्यानुसार या जुन्या संचाची २५० कोटी किंमत योग्य आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.लोकमतने याबाबतीत एमएसटीसीच्या इतर आॅनलाईन लिलावांचीही माहिती घेतली. पश्चिम बंगालमधील संथालडीह ऊर्जा प्रकल्पाचे १२० मे.वॅ.चे चार संच २०१२ साली ११४ कोटीत विकले गेले होते. त्याचबरोबर सध्या उत्तर प्रदेशातील ओबरा प्रकल्पाच्या ५० मे.वॅ.च्या तीन संचाचा आॅनलाइन लिलाव सुरू आहे. २० जून शेवटची तारीख आहे. त्याची सरकारी किंमतच ६५ कोटी आहे.
(उद्या वाचा - महाजनकोचे अधिकारी काय म्हणतात.)