सिल्लोडमध्ये महाजनादेश यात्रेत फडणवीसांपेक्षा आमदार सत्तारांची अधिक चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 10:55 AM2019-08-29T10:55:11+5:302019-08-29T11:10:49+5:30
मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला आलेल्या सत्तार यांना फडणवीस यांनी थेट आपल्या बसवर प्रवेश दिला.
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बुधवारी सिल्लोडमध्ये आली असताना आमदार अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजपचे स्थानिक नेते असा वाद पाहायला मिळाला. सत्तार यावेळी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी चर्चा असताना, सत्तार यांची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी यावेळी केला. मात्र माघार घेतील ते सत्तार कसले ? आंबेडकर चौकात उभारलेल्या मंचासमोर यात्रा येताच सत्तार यांनी थेट महाजनादेश यात्रेच्या बसवर प्रवेश मिळवला. त्यामुळे सिल्लोडमध्ये आलेल्या महाजनादेश यात्रेत फडणवीसांपेक्षा आमदार सत्तारांची अधिक चर्चा पाहायला मिळाली.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सिल्लोडमध्ये येणार म्हणून फडणवीस यांच्या स्वागताच्या तयारीसाठी स्थानिक भाजप नेते आणि आमदार सत्तार यांच्यात तीन दिवसांपासून स्पर्धा लागली होती. बुधवारी सकाळपासूनच दोन्ही गटात नीलम चौकात व्यासपीठ उभारणीवरून वाद सुरु होता. सत्तार यांनी उभारलेल्या स्टेजला भाजप नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे शेवटी पोलिसांनी व्यासपीठ उभारणीला परवानगी नाकारली आणि स्टेज ताब्यात घेतला.
सत्तार यांची कोंडी करण्यात अपना यशस्वी झाल्याचा आनंद भाजपच्या नेत्यांना होत नाही तोच, सत्तार यांनी आंबेडकर चौकात आपला व्यासपीठ उभारणीचा निर्णय घेतला. यात्रा सिल्लोडमध्ये आल्यावर आधी नीलम चौकात भाजपच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले. मात्र त्यांनतर ही यात्रा पुढे आंबेडकर चौकात येताच सत्तार यांनी उभारलेल्या व्यासपीठा जवळ थांबवण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या सत्काराला आलेल्या सत्तार यांना फडणवीस यांनी थेट आपल्या बसवर प्रवेश दिला.
विशेष म्हणजे सत्तार हे बसवर चढत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी हात पुढे करता त्यांना आधार दिला. सत्तार हे बसवर चढताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बस शहरात जाईपर्यंत सत्तार बसवरच उभे होते. भाजपच्या समर्थकांनी रोखण्याच्या केलेल्या अथक प्रयत्नांनंतर ही आमदार सत्तार हे आपल्या खेळीत यशस्वी झाले. त्यामुळे महाजनादेश यात्रेत फडणवीसांपेक्षा आमदार सत्तारांची अधिक चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.