अमरावती : भाजपच्या महाजनादेश यात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १ आॅगस्टपासून गुरूकुंज मोझरी येथून प्रारंभ होत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह केंद्र व राज्य सरकारमधील अनेक मंत्री, भाजपचे खासदार, आमदार यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
राज्य सरकारची कामगिरी, लोकांपर्यत पोहचवून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली जात आहे.३४ जिल्हे आणि १५१ मतदार संघातून यात्रा प्रवास करणार आहे. गुरुकुंज मोझरी हे गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी, तपोभूमी आहे. येथूनच ग्रामोद्वार आणि ग्रामगीतेचा उगम झाला आहे. १ आॅगस्ट हा दिवस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथीचा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा १ आॅगस्टपासून काढण्याचा निर्धार केल्याचे पालकमंत्री बोंडे यांनी सांगितले.