सोलापूर : महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे प्रभारी अध्यक्ष जे.पी. नड्डा एक सप्टेंबर रोजी सोलापूर मुक्कामी येणार असल्याची माहिती भाजपच्या शहर कार्यकारिणीने दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप १ सप्टेंबर रोजी सोलापुरात होणार आहे. सायंकाळी सहा वाजता पार्क स्टेडियमवर समारोपाची सभा होईल. या कार्यक्रमास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्याचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे खास विमानाने सोलापुरात आगमन होणार आहे. समारोप कार्यक्रमास उशीर होणार असल्याने रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहा यांचाही सोलापुरात मुक्काम राहणार आहे. त्यादृष्टीने शहर भाजप व जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन सुरू झाले आहे. पार्क स्टेडियमवर कार्यक्रमासाठी मंडप उभारण्याची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान अमित शहा यांना सभा संपवून लवकर परत जाता यावे यासाठी ही सभा सायंकाळी सात ऐवजी सायंकाळी चार वाजता व्हावी यासाठी भाजपच्या नेत्यांचे प्रयत्न सुरु होते.
या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजप प्रवेश कोणाकोणाचा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षातील नेते शिवसेना व भाजपच्या वाटेवर आहेत.
शिवसेना प्रवेशासाठी आमदार दिलीप सोपल यांनी मंगळवारी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे गेल्या महिन्यात सोलापूर दौºयावर आल्यावर भाजप प्रवेशासाठी विरोधी पक्षातील अनेक आमदार राजीनामे देतील, अशी घोषणा केली होती. अद्याप तरी कोणी आमदारांनी भाजप प्रवेशासाठी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे या कार्यक्रमात कोणाचा प्रवेश होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
सुशीलकुमार शिंदे यांचाही मुक्कामविशेष म्हणजे १ सप्टेंबर रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सोलापूर दौºयावर येत आहेत. दहा दिवस त्यांचा सोलापुरात मुक्काम राहणार आहे. जनवात्सल्यवर पहिल्यांदा शिंदे कुटुंबीय गणेशोत्सव साजरा करणार आहेत.