जान्हवी मोर्ये,
डोंबिवली- आतापर्यंत १६ साहित्य संमेलनांच्या आयोजनाचा अनुभव गाठीशी असलेल्या कोमसापला घटक संस्था नसतानाही डोंबिवलीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सन्मानाने सहभागी करून घेतले, तर सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी कोमसापने दर्शवली आहे. मात्र, कोमसापचे अस्तित्वच राहिलेले नाही, अशी भूमिका महामंडळाच्या सदस्यांनी घेतल्याने महामंडळ व कोमसाप यांच्यातील दुरावा या संमेलनातही दिसणार आहे.कोमसापला साहित्य महामंडळाची घटक संस्था म्हणून मान्यता देण्याची मागणी जुनी आहे. मात्र, महामंडळाने ती मान्य केली नसल्याने कोमसाप आपली वेगळी चूल मांडत आली आहे. घटक संस्था म्हणून मान्यता देण्याची मागणी केल्याचे कोमसाप दाखवत असली तरी प्रत्यक्षात ही मागणी रेटत नसल्याने कोमसापला आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यात यश असल्याचे काहींचे मत आहे.अ.भा. साहित्य संमेलनास कोमसापचा पाठिंबा आहे का, असा सवाल कोमसापचे डॉ. महेश केळुसकर यांना केला असता ते म्हणाले की, संमेलनास पाठिंबा द्यायचा म्हणजे आम्ही काय करायचे? संमेलनास पाठिंबा हा घटक संस्थांकडून घेतला जातो. कोमसापला महामंडळाने घटक संस्थेचा दर्जा दिलेला नाही. कोमसापच्या ६० शाखा असून त्याद्वारे विविध साहित्यिक कार्यक्रम घेतले जातात. आतापर्यंत कोमसापने १६ साहित्य संमेलने भरवली आणि ती यशस्वीपणे पार पाडली आहेत. आम्हाला घटक संस्थेचा दर्जा दिलेला नसला तरी कोमसापचा डोंबिवलीतील संमेलनास पाठिंबा आहे. महामंडळाने आमच्याकडे संमेलनासाठी काही मदत मागितली तर ती आम्ही निश्चित करू. सर्व विचारधारांना सामावून घेणारे हे साहित्य संमेलन व्हावे. अमुक एका विचारधारेला बाजूला सारून झालेले साहित्य संमेलन, असा त्याचा लौकिक होऊ नये. संमेलनाचा खर्च पाच कोटींपर्यंत जाणार, असे माझ्या वाचनात आले. संमेलनाचा खर्च आटोपशीर व्हायला हवा. राजकीय मंडळी पैसा देणार म्हणजे त्यांचा वावर आयोजकांना टाळता येणार नाही. मात्र, संमेलनावर त्यांचा प्रभाव असता कामा नये, अशी अपेक्षा केळुसकर यांनी व्यक्त केली. >घटक संस्थेचा दर्जा देण्याचा प्रश्न येत नाहीकोमसापच्या या भूमिकेकडे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य प्रकाश पायघुडे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, कोकण हा विभागही महामंडळाच्या अखत्यारित येतो. मात्र, कोमसापही ही स्वतंत्र संस्था आहे. कोमसाप ही स्वतंत्र संस्था असल्याने तिला घटक संस्थेचा दर्जा देण्याचा प्रश्न येत नाही. कोमसापचे अस्तित्व फारसे राहिलेले नाही. महामंडळाच्या या भूमिकेबद्दल कोमसापने आश्चर्य व्यक्त केले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद ही राज्यभरात आहे. ठाणे, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, सांगली हे सगळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा भाग आहेत. त्यात खूप संस्था आहेत. बेळगाव, निपाणी, कारवार हा महाराष्ट्राचा सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, हा मुद्दा प्रलंबित आहे. सध्या स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे. तसा कोकणचा प्रश्न नाही. घटक संस्थेचा दर्जा दिला नाही म्हणून एखाद्या संस्थेची नाराजी असू शकते, असे पायघुडे म्हणाले.