जैतापूर, दि. 9 - रिफायनरी प्रकल्पाविरोधात राजापूर तालुक्यातील नाणारसह परिसरातील 14 गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत. या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवण्यासाठी या 14 गावातील ग्रामस्थांनी शनिवारी तहसिलदार व प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या महामोर्चामध्ये शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. या मोर्चेक-यांनी यावेळी प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवाय, त्यांनी आपल्या व्यथा तहसिदार आणि प्रांत कार्यालयाकडे निवेदनाद्वारे दाखल केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. दरम्यान, अणुऊर्जा प्रकल्पापाठोपाठ रिफायनरी प्रकल्पातील संघर्ष आणखीनच तीव्र होणार असल्याचं दिसते आहे.
काय आहे नेमका प्रकल्प?केंद्र शासनाच्या भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम व इंडियन ऑईल अशी 51 टक्के, तर राज्य सरकारची 49 टक्के भागीदारी असलेला जगातील सर्वात मोठा दोन लाख कोटींचा रिफायनरी प्रकल्प तालुक्यातील नाणार -सागवे परिसरात येऊ घातला आहे. एकूण या प्रकल्पाला 15 हजार एकर जमीन आवश्यक असून काही एकर जागेवर तो उभा राहणार आहे. हा प्रकल्पही अणुऊर्जा प्रकल्पाप्रमाणेच प्रदूषणकारी असल्याचे आरोप स्थानिक जनतेतून होत असून आमच्या बागायती, भातशेती व निसर्ग यांचे रक्षण व्हावे या हेतूने येथील जनता प्रकल्पाविरुद्ध उभी ठाकली आहे. दरम्यान, हा प्रकल्पच रद्द झालाच पाहिजे, यासाठी व्यापक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे. याचाच एक भाग म्हणून शनिवारी (9 सप्टेंबर ) तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.