मुंबई- विधानपरिषदेत भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी तारांकीत प्रश्नावेळी महानंदा दुध संस्थेच्या भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित केले. यावेळी त्यांनी महानंदावर प्रशासक नेमन्याची मागणी केली. या प्रश्नावरील चर्चेत काँग्रेस आमदार सतेज पाटील, आमदार भाई जगताप, आणि आमदार महादेव जाणकर यांनी भाग घेतला.
महाराष्ट्र राज्य दूध महासंघ (महानंद दुग्धशाळा) संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत संपली असून त्यावर प्रशासकांची नियुक्ती केली जाईल आणि गेल्या काही वर्षांतील गैरव्यवहारांची चौकशी केली जाईल, अशी घोषणा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधान परिषदेत केली.
प्रवीण दरेकर यांनी ट्विटही करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महानंदा महाराष्ट्र दूध संस्थेचे गेल्या १० वर्षातील आर्थिक गैरव्यवहार, दूध भुकटी अनुदान यासंदर्भात चौकशी करण्यात यावी. लेखापरीक्षण अहवालात जे गैरव्यवहार निदर्शनास आले आहेत, त्यानुसार संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
महानंद हा दुग्धव्यवसायातील एकेकाळी नामांकित व लोकप्रिय ब्रँड असताना आणि २००४-०५ मध्ये आठ लाख लिटर प्रतिदिन विक्रीचा उच्चांक गाठलेली ही संस्था २०२१ मध्ये प्रतिदिन १.४ लाख लिटर इतकी दूध विक्री करीत आहे. नफा कमावणाऱ्या या संस्थेला संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे ५० कोटी रुपये तोटा सहन करावा लागत असून वेतन व अन्य खर्चासाठी नियमित ओव्हरड्राफ्ट काढून कारभार करावा लागत आहे.